उभ्या पिकानंतर आता धान गंजीवर हत्तींचा हल्ला, नासधूस सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:03 PM2023-11-21T17:03:04+5:302023-11-21T17:51:36+5:30
टेंभा-चांभार्डा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान
गडचिराेली : अल्प व मध्यम मुदतीच्या धान पिकाची मळणी व अधिक मुदतीच्या धानाची कापणी सुरू असतानाच रानटी हत्तींकडून धान पिकाची नासधूस केली जात आहे. यापूर्वी शेतातील उभ्या धान पिकाची नासधूस रानटी हत्ती करीत हाेते; परंतु आता तर शेतकऱ्यांनी धान गाेळा करून तयार केलेल्या धान गंजीवर (पुंजणे) ताव मारून मळणीसाठी तयार असलेल्या धानाची नासाडी करीत आहेत.
वडधासह परिसरातील टेंभा व चांभार्डा येथील खैरी भागातील शेतकऱ्यांचे नुकसान केले. आरमाेरी, धानाेरा व गडचिराेली आदी तीन तालुक्याच्या सीमेवर गेल्या २० दिवसांपासून रानटी हत्तींचा वावर आहे. रांगी, नरचुली, पिपरटाेला, वडधा, डार्ली आदी गाव परिसरातील धान पिकांची रानटी हत्तींच्या कळपाने नासधूस केली हाेती. गेल्या दाेन दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप टेंभा- चांभार्डा परिसराच्या जंगलात वावरत आहे. दाेन्ही गावातील शेतकऱ्यांची शेती खैरी रिठ परिसरात आहे. सध्या शेतकऱ्यांनी धान गाेळा करून गंजी तयार केली हाेती. या शेतकऱ्यांच्या धान गंजी रानटी हत्तींनी उपसून फेकल्या. त्यामुळे मळणीच्या प्रतीक्षेत असलेले पीक वाया गेले.
वडसा वनविभाग झाला सुस्त
रानटी हत्तींच्या कळपाने धान व अन्य पिकांची सर्वाधिक हानी वडसा वनविभागातील केली. हत्तींच्या कळपाला पांगवण्यासाठी हुल्ला टीम व स्थानिक वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी असतानाही पिकांची हानी का राेखता आली नाही. विशेष म्हणजे, हुल्ला टीम स्थानिक वनकर्मचाऱ्यांना तर वनकर्मचारी शेतकऱ्यांना हत्तींना पांगवण्यासाठी शेतात जाऊ देत नाही व स्वत:ही हत्तींना याेग्य दिशेने नेत नाही. ही सर्व स्थिती हाताळणारे वडसा वनविभागातील वरिष्ठ अधिकारी निष्क्रिय व सुस्त असल्याचे दिसून येते.
डार्ली गावाजवळ आला हत्तींचा कळप
रानटी हत्तींचा कळप दाेन दिवसांपूर्वी डार्ली गावाजवळ आला. येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान गंजी रानटी हत्तींनी उपसून फेकल्या. तसेच धानाची लाेंबी फस्त केली. धान खाण्यापेक्षा नासधूस अधिक केली. रात्रीच्या सुमारास हा कळप गावाजवळच्या शेतात आला हाेता. सुदैवाने हत्तींचा कळप गावात शिरला नाही. अन्यथा लाेकांना धाेका निर्माण झाला असता.
तीन तालुक्याच्या सीमेवर मांडले ठाण
रानटी हत्तींचा कळप गेल्या आठवडाभरापासून आरमाेरी तालुक्यातील नरचुली भागात हाेता. त्यानंतर कळपाने माैशिखांब परिसरात धडक देऊन तेथील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस केली. पुन्हा डार्ली व वडधा परिसराकडे माेर्चा वळवून येथील धान पिकाची नासधूस केली. आता हा कळप टेंभा, चांभार्डा व मरेगाव जंगल परिसरात वावरत आहे. हे क्षेत्र आरमाेरी, गडचिराेली व धानाेरा आदी तिन्ही तालुक्यात येते. यापूर्वी हा कळप धानाेरा तालुक्याच्या रांगी परिसरात वावरत हाेता.
हुल्ला टीम असतानाही पिकांचे नुकसान कसे?
रानटी हत्तींचा कळप जंगलाच्या दिशेने पांगवण्यासाठी पश्चिम बंगाल राज्यातून हुल्ला टीम बाेलावली आहे. ह्या टीमकडे रानटी हत्तींना जंगलात पांगवणे व हत्तींपासून लाेकांचा बचाव करणे ही जबाबदारी आहे; परंतु ही टीम असतानाही शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस हाेत आहे. हुल्ला टीम असतानाही हत्ती शेतात कसे येत आहेत. त्यावर टीमचे नियंत्रण का नाही, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे.