तब्ब्ल साडेतीन वर्षानंतर गडचिराेलीला मिळाले नियमित प्राथमिक शिक्षणाधिकारी
By दिलीप दहेलकर | Published: February 28, 2024 09:00 PM2024-02-28T21:00:14+5:302024-02-28T21:00:37+5:30
दहा तालुक्याला पाच वर्षांपासून नियमित गटशिक्षणाधिकारी नाही
दिलीप दहेलकर, गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा स्तर व गुणवत्ता राखून ते टिकविण्याची जबाबदारी या विभागातील कार्यरत अधिकाऱ्यांवर आहे. मात्र जिल्हयात अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागातील पर्यवेक्षिय यंत्रणा पांगळी झाली आहे. तब्बल साडेतीन वर्षांनंतर जि. प. ला नियमित प्राथमिक शिक्षणाधिकारी मिळाले असून नव्या शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान दहा पंचायत समितीला गेल्या पाच वर्षांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी आहेत. या दहा नियमित गटशिक्षणाधिकारी केव्हा मिळणार? असा सवाल जिल्हयातील पालकांनी सरकारकडे उपस्थित केला आहे.
गडचिराेली आणि सिराेंचा वगळता इतर दहा तालुक्यात नियमित व स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी नाहीत. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांची दहा पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण सेवा गट अ मधील (प्रशासन शाखा) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार तात्पुरती पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला नविन प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून वा. ह. भुसे तर प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बा.शं. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात व जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असून १ मार्चपासून इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू हाेणार आहे. तत्कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) वैभव बारेकर आणि शिक्षणाधिकारी (प्राथ.) विवेक नाकाडे यांच्या यशस्वीपूर्ण नियोजन व मार्गदर्शनात बारावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बाराही तालुक्यात मिळून जवळपास १५५० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये चार हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर जि.प.मध्ये शिक्षण विभाग असून या विभागामार्फत तालुक्यावर नियंत्रण ठेवले जाते. मात्र ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील शाळा, तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता यासह विविध शैक्षणिक बाबींवर तालुक्याची पर्यवेक्षिय यंत्रणा नियंत्रण ठेवत असते. सदर पर्यवेक्षिय यंत्रणेमध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख आदींचा समावेश आहे. मात्र नियमित गटशिक्षणाधिकारी नसल्याने या भागातील शाळांवरील नियंत्रण सैल झाले आहे.
या तालुक्याला स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी केव्हा मिळणार?
जिल्हयात एकुण बारा पंचायत समिती असून केवळ दाेन पंचायत समितीला नियमित व स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी आहेत. यामध्ये गडचिराेली पं. स. ला हेमलता परसा तर सिराेंचा येथे निलकंठनम हे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. काेरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमाेरी, धानाेरा, चामाेर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आदी ठिकाणची गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. गेल्या पाच वर्षांपासून या दहा ठिकाणचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे साेपविण्यात आला आहे.