तब्बल दोन महिन्यानंतर पालकमंत्री पोहोचले तुमरगुंडात
By admin | Published: March 20, 2016 01:09 AM2016-03-20T01:09:35+5:302016-03-20T01:09:35+5:30
तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी तोंदे पोटावी यांचा १० वर्षीय मुलगा संदीप याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे.
पोटावी कुटुंबीयांचे केले सांत्वन : आर्थिक मदतही दिली
एटापल्ली : तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी तोंदे पोटावी यांचा १० वर्षीय मुलगा संदीप याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. संदीप पोटावी याने १३ जानेवारी २०१६ रोजी रात्री शेवटचा श्वास घेतला. अहेरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तब्बल दोन महिन्यानंतर तुमरगुंडा येथे शनिवारी पोहोचले. त्यांनी पोटावी कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले.
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम अचानक तुमरगुंडा गावात पोहोचल्यानंतर सर्व ग्रामस्थ आश्चर्यचकीत झाले. भेटीदरम्यान पालकमंत्री आत्राम यांनी संदीपचे वडील तोंदे पोटावी यांच्याशी चर्चा करून त्यांना आर्थिक मदत दिली.
एटापल्लीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या तुमरगुंडा येथील संदीप पोटावी हा मुलगा १७ नोव्हेंबर रोजी आजारी पडला. दरम्यान एटापल्लीच्या खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. संदीपच्या रक्त नमुन्याची तपासणी करण्यात आली. तपासणी रिपोर्टमध्ये ब्रेन मलेरियाचे लक्षण आढळून आले. त्यानंतर संदीपच्या कुटुंबीयांनी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुजाऱ्यांकडे नेऊन संदीपवर उपचार केला. त्यानंतर १२ जानेवारी रोजी संदीपची प्रकृती अचानक ढासळली. त्याच रात्री संदीपचे वडील तोंदे पोटावी रात्री १०.३० वाजता एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात संदीपला दाखल केले. १३ जानेवारी रोजी सायंकाळला संदीपचा मृत्यू झाला. रूग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर संदीप जीवंत होता. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. वडील तोंदे पोटावी आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना त्याची कोणीही मदत केली नव्हती. (शहर प्रतिनिधी)