दोन वर्षांनंतर महाशिवरात्रीसाठी यावर्षी शिवालये गजबजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:57 PM2023-02-17T17:57:39+5:302023-02-17T17:58:56+5:30
मार्कंडासह अनेक ठिकाणी जत्रा, विशेष बसफेऱ्यांचेही नियोजन; गर्दी टाळण्याचे आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणी असणारी शिवमंदिरे शनिवारी (दि.१८) महाशिवरात्रीनिमित्त गजबजणार आहेत. कोरोनाकाळातील दोन वर्ष जत्रा भरविण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे यावर्षी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता पाहता प्रशासनाने सर्व प्रकारची व्यवस्था ठेवण्याचे नियोजन केले आहे. प्रसिद्ध मार्कंडा देवस्थानाबरोबरच इतरही ठिकाणी महाशिवरात्रीची जत्रा भरणार आहे. यावेळी भाविकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विविध विभागांच्या नियोजन बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. यावर्षी प्रशासनाकडून मार्कंडा देवस्थानासह आरततोंडी (कुरखेडा), डोंगरी (आरमोरी), चपराळा (चामोर्शी), वैरागड, पळसगाव (आरमोरी), वांगेपल्ली, वेंकटापूर (अहेरी) व सोमनूर (सिरोंचा) या ठिकाणी भाविकांसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी सूचनाफलक, दिशादर्शक फलक तयार केले आहेत. भाविकांनी सूचनांचे पालनही करणे अपेक्षित आहे.
बोटमधून प्रवास करताना खबरदारी घ्या
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून समग्र प्रवेश मार्ग व निर्गमन मार्ग आखून घेण्यात आले आहेत. काही ठिकाणी भाविक नदीतील बोट वापरून प्रवास करतात. यावेळी प्रवासाकरिता सुरक्षित मार्ग आखून दिला असेल तरच त्या ठिकाणी प्रवास करावा, अन्यथा पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
स्नान करताना विशेष काळजी घ्या
यात्रेसाठी येणारे भाविक दर्शनाआधी नदीपात्रात किंवा शेजारील उपलब्ध पाण्यात स्नान करून देवदर्शन घेतात. यावेळी प्रशासनाकडून नियोजित केलेल्या ठिकाणीच स्नान करावे. लावलेल्या बॅरिकेड्सच्या बाहेर जाऊन किंवा इतरत्र स्नान करणे जीविताला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांनी कुठल्याहीप्रकारे सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रशिक्षित ३०० आपत्ती मित्र करणार मदत
जिल्हा आपत्ती प्राधिकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडक ३०० युवक-युवतींना आपत्ती व्यवस्थापनाबत प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान हे आपत्ती मित्र प्रशासनाला सहकार्य करून व्यवस्था राखण्याबाबत भाविकांना मदत करणार आहेत.
गडचिराेलीवरून मार्कंडासाठी ७० रुपये तिकीट
महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या चामाेर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील जत्रेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपासून गडचिराेली, चामाेर्शीवरून बसेस साेडल्या जाणार आहेत. गडचिराेली ते मार्कंडासाठी ७० रुपये व चामाेर्शी ते मार्कंडासाठी २० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. ३० ते ३५ प्रवासी मिळताच बस साेडली जाणार आहे. गडचिराेलीवरून सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध राहील. तसेच मार्कंडावरून रात्री १० वाजता शेवटची बस गडचिराेलीसाठी साेडली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, व्याहाड येथूनही बस साेडली जाणार आहे, अशी माहिती गडचिराेली बस आगाराचे व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांनी दिली.