आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध पुन्हा नक्षल्यांनी बॅनरबाजी, झेड सुरक्षा प्रदान
By मनोज ताजने | Published: January 6, 2023 11:01 AM2023-01-06T11:01:28+5:302023-01-06T11:02:59+5:30
माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध पुन्हा एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे बॅनर आढळले आहे.
गडचिरोली: माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध पुन्हा एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे बॅनर आढळले आहे. दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना गडचिरोली जिल्ह्यासाठी झेड सुरक्षा देण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांचा विरोध असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीला मदत करत असल्यावरून नक्षलवाद्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धर्मरावबाबा यांच्याविरुद्ध आगपाखड करत त्यांना बॅनरच्या माध्यमातून धमकी दिली होती. हा मुद्दा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल असे स्पष्ट केले होते. गुरुवारी रात्री पुन्हा नक्षल्यांनी बॅनर लावले.
दरम्यान आ. धर्मरावबाबा यांना गडचिरोली जिल्ह्यासाठी झेड सुरक्षा दिली असून विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीओ) १० जवान त्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात जाताना अतिरिक्त सुरक्षा दिली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
आरएफओ आणि वन कर्मचाऱ्यांना नक्षल्यांची मारहाण
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना नक्षलवाद्यांनी रात्री मारहाण केल्याचे वृत्त आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणासाठी झाली हे कळू शकले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"