पुन्हा सुरू झाला प्लास्टिकचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 01:01 AM2020-02-05T01:01:46+5:302020-02-05T01:02:12+5:30
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन राज्य शासनाने प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. काही विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक वापरणे कायद्यान्वये गुन्हा ठरविला आहे. मागील वर्षी प्रतिबंधित प्लास्टिक पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. यावर्षी मात्र ही मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे सर्व तोटे लक्षात घेता राज्य शासनाने ५० मायक्रोेनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. याबाबत राज्य शासनाने २ जुलै २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली. या अधिसूचनेत प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. राज्य शासनाने परिपत्रक निर्गमित केल्यानंतर महापालिकेने मागील वर्षी परिपत्रक निर्गमित केले. या परिपत्रकानंतर नगर पालिकेने प्लास्टिक व थर्माकोल जप्त करण्याची मोहीम हाती घेतली होती. याला दुकानदारांनीही चांगला प्रतिसाद दर्शविला. त्यानंतर मात्र नगर पालिकेने प्लास्टिक जप्तीची मोहीम जवळपास बंदच केली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर वाढला आहे.
विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीबरोबरच नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या दुष्परिणांमाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. यासाठी नगर पालिका प्रशासनाने विशेष पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
वर्षभरात केवळ पाच क्विंटल प्लास्टिक जप्त
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने मागील वर्षी पथक तयार केले होते. या पथकाने २०१९ या वर्षभरात सुमारे १२० आस्थानांची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये ३२ आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याचे दिसून आले. या दुकानांमधून सुमारे ४३९ किलो प्लास्टिक जप्त केली आहे. तसेच त्यांच्याकडून ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतर मात्र मोहीम थंडावली आहे.
दंड व कारवासाची शिक्षा
प्लास्टिक व थर्माकोल बंदीचा कायदा कडक करताना राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करणाऱ्यांवर दंड व कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद केली आहे. पहिला गुन्हा केल्यास पाच हजार रुपये, दुसºया गुन्ह्यास दहा हजार रुपये व तिसºया गुन्ह्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र या नियमानुसार कारवाई होत नसल्याने शहरात पुन्हा खुलेआम प्लास्टिकचा वापर सुरू झाला आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी मोहीम उघडण्याची आवश्यकता आहे.