वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

By दिगांबर जवादे | Published: June 16, 2023 05:45 PM2023-06-16T17:45:12+5:302023-06-16T17:47:13+5:30

आयटकच्या नेतृत्वात आंदोलन

Aggressive Anganwadi workers stage dharna in front of Zilla Parishad Gadchiroli for increased salary | वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

वाढीव मानधनासाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर दिले धरणे

googlenewsNext

गडचिरोली : वाढीव मानधन देण्यात यावे, मासिक पेन्शन, प्रवासभत्ता, इंधनबिल, एकरकमी सेवानिवृत्तीचा लाभ, ग्रॅच्युईटी, कोरोनाकाळात मृत पावलेल्या सेविकांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले. त्यांची शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देत शासनाविरोधात घोषणा दिल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यात येणारे मानधन दरमहा एकत्रित व नियमित ५ तारखेच्या आत देण्यात यावे. २० टक्के मानधनवाढ त्वरित देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचे तत्त्वत: मान्य केले होते, त्याची अंमलबजावणी करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ त्वरित देण्यात यावे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यात यावा. प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी केंद्राच्या लाभार्थ्यांना बेबी केअर किट दिले जाते. ही किट घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रकल्प कार्यालयात बोलावले जाते. परंतु याकरिता कोणताही भत्ता दिला जात नाही. सेविका स्वतःचे पैसे खर्च करून बेबीकेअर किट लाभार्थ्यांना पोहोचते करतात.

ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन मिळाले नाही त्यांना जुन्या पद्धतीने मानधन देण्यात यावे. गेल्या चार वर्षांपासून टीएडीएची रक्कम देण्यात आली नाही, ती देण्यात यावी. शासनामार्फत अंगणवाडीला लागणारे सर्व प्रकारचे रजिस्टर खरेदी करून देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ द्यावा, मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे, तसे प्रस्ताव विनाविलंब केंद्र सरकारकडे पाठविण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी संघटना आयटकचे राज्य सचिव देवराव चवळे, राधा ठाकरे, मीनाक्षी झोडे, अनिता अधिकारी, ज्योती कोमलवार, सैला पठाण, रूपा पेंदाम, ज्योती कोल्हापुरे, शुभलता बावनथडे, वनमाला गुरनुले, कविता चन्ने, माधुरी रामटेके, अल्का लाऊतकर, रूपाली क्षीरसागर, कांता फटिंग, मीरा उके, सुनीता कायरकर, मीती रॉय, गजुला उसेंडी, प्रमिला मने यांनी केले.

Web Title: Aggressive Anganwadi workers stage dharna in front of Zilla Parishad Gadchiroli for increased salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.