कृषीपंप वीज जोडणी थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:31 AM2018-04-14T01:31:45+5:302018-04-14T01:31:45+5:30
ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंडबस्त्यात आहे.
शासनाकडून अनुदानावर विहीर उपलब्ध होत आहेत. विहिरीतील पाण्याचा उपसा करून पीक घेण्यासाठी शेतकरी इच्छुक आहेत. ज्या शेतकºयांना विहीर प्राप्त झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणी मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. वीज जोडणीसाठी आवश्यक असलेले डिमांड सुध्दा भरले आहेत. वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने वर्षभरापूर्वी मोहीम उघडली होती.
मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही महावितरणने वीज जोडणी उपलब्ध करून दिली नाही. काही शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर पंप खरेदी केले. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने खरेदी केलेल्या पंपाचे पैसे शेतकऱ्यांच्या उरावर बसले आहेत. एकीकडे शासन सिंचनाची सुविधा वाढावी, यासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे वीज विभागाच्या दुर्लक्षामुळे वीज जोडणी होण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. वैरागड परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहेत. या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. सदर अर्ज कार्यालयात पडून आहेत. वीज जोडणीसाठी वीज कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
मागेल त्याला वीज जोडणी अभियान फेल
वीज वितरण कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर नसल्याने शेतकऱ्यांचे अर्ज वर्षनोवर्ष पडून राहत होते. एक महिन्यापूर्वी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणी होताच जुने मीटर बदलवून दिले जाईल. त्याचबरोबर नवीन मीटर लावून दिले जाईल, असे कळविले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती भिन्न असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी व घरगुती ग्राहकांनी अर्ज करून सुध्दा वीज जोडणी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.
वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकरी व घरगुती ग्राहकांची निकाली काढण्याची मागणी होत आहे.