कृषी सहायक कामबंद आंदोलनावर
By admin | Published: July 12, 2017 01:22 AM2017-07-12T01:22:43+5:302017-07-12T01:22:43+5:30
मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाच सुधारीत आकृतबंध तयार करणे
शेतीवर परिणाम : सुधारित आकृतीबंध तयार करा; शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी, कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाच सुधारीत आकृतबंध तयार करणे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहायकांनी १० जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील कृषी सहायकांनीही संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पत्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात १३३ कृषी सहायक सहभागी झाले आहेत.
कृषी पर्यवेक्षकाची १०० टक्के पदे, कृषी सहायकाच्या पदोन्नतीतून भरण्यात यावी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी सर्व लाभार्थ्यांकरिता ग्राह्य धरावा, कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करावे, कृषी सहायकांच्या आंतर संभागीय बदल्याबाबत तत्काळ आदेश काढावा, आदी मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी सहायक आंदोलन करीत आहेत. १२ जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यात आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने नाइलाजास्तव कृषी सहायकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऐन खरीप हंगामात कृषी सहायक आंदोलनावर गेल्याने शेतकऱ्यांची फार मोठी पंचाईत होणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने दिला आहे.