कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:47 PM2017-11-02T23:47:08+5:302017-11-02T23:47:20+5:30
गडचिरोली डिस्ट्रिक्ट अॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली डिस्ट्रिक्ट अॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. गुरूवारी जिल्हाभरात कृषी केंद्र बंद ठेवून विविध मागण्यांचे निवेदन तालुका स्तरावर तहसीलदारांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.
कुरखेडा येथील तहसीलदार अजय चरडे असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी केल्यामुळे विषबाधा होऊन शेतकºयांचा मृत्यू झाला. यासाठी कृषी केंद्र चालकाच जबाबदार असल्याचा प्रचार केला जात आहे. कृषी केंद्र चालकांवर पोलीस कारवाई, विक्री परवाना रद्द करणे, विक्रीबंद आदेश देणे अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची कारवाई केली जात आहे. मात्र सदर कारवाई चुकीची असून अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कठीण आहे. ज्या कृषी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना कुरखेडा, कोरची तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश भटड्ड, उपाध्यक्ष बी. के. लोणारे, कमल खंडेलवार, सचिव विकास भटड्ड, परसराम नाट, गिरेश्वर उईके, गजेंद्र भटड्ड, भोजराज बन्सोड, विद्येश्वर बावनथडे, सुधाकर भरणे, कार्तिक रॉय, दिनेश गजभिये, चुन्नीलाल दरवडे, एकनाथ मेश्राम उपस्थित होते.
आरमोरी तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार धाईत यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
धानोरा तालुका असोसिएशनच्या वतीने गुरूवारी कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले, अशी माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष बशीर पिराणी यांनी दिली. कृषी केंद्र चालकांवर पोलीस व प्रशासनामार्फत राज्यात केली जात असलेली कारवाई योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. धानोरा तालुक्यातील रांगी, मुरूमगाव, पेंढरी, चातगाव, मोहली, कारवाफा आदी ठिकाणी कृषी केंद्र बंद ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक शेतकºयांना विविध वस्तूंसाठी अडचणींचा सामना करावा लागला.