खोट्या दस्तावेजाच्या आधारे घेतला कृषी परवाना
By admin | Published: July 13, 2017 01:55 AM2017-07-13T01:55:01+5:302017-07-13T01:55:01+5:30
तालुक्यातील राखी (गुरवळा) येथील अजय परशुराम ईटकेलवार यांनी खोट्या दस्तावेजाच्या आधारे
गुन्हा नोंदवा : पत्रपरिषदेतून खोब्रागडे यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील राखी (गुरवळा) येथील अजय परशुराम ईटकेलवार यांनी खोट्या दस्तावेजाच्या आधारे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी कार्यालयाकडून कृषी केंद्राचा परवाना मिळविला. त्यामुळे सदर कृषी परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राखी येथील रहिवासी खुशाल नत्थुजी खोब्रागडे यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे, अशी माहिती खोब्रागडे यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, अजय ईटकेलवार यांनी घराचे घरटॅक्स पावती, गाव नमूना आठ खोटे सादर केले आहे. घर क्र. १५४ ची बनावट घरटॅक्स पावती तयार करून रबर स्टॅम्प बाजारातून विकत घेऊन बनावट स्वाक्षरी करून ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ईटकेलवार यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्याकडे असलेला कृषी माल जप्त करून त्यांचा कृषी परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात जि.प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसडीओ व बीडीओंना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.