कुरूड व विसाेरा येथे कृषी गाेदाम मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:54+5:302021-06-18T04:25:54+5:30
देसाईगंज तालुक्यात उन्हाळी व पावसाळी या दाेन्ही हंगामात शेतकरी धानासह विविध पिके घेतात. परंतु त्यांना धान साठवणुकीसाठी जागा मिळत ...
देसाईगंज तालुक्यात उन्हाळी व पावसाळी या दाेन्ही हंगामात शेतकरी धानासह विविध पिके घेतात. परंतु त्यांना धान साठवणुकीसाठी जागा मिळत नाही. परिणामी मिळेल त्या दरात शेतमाल विक्री करावा लागताे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन हाेऊनही साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध नाही. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीची व्यवस्था नसल्याने तसेच त्यांना पैशाची अत्यंत गरज राहत असल्याने मळणीनंतर लगेच बाजारात मालाची विक्री करावी लागते. याच हंगामात धानाचे दर पाडले जातात. परिणामी शेतकऱ्यांना याेग्य भाव मिळत नाही. कुरूड-विसाेरा परिसरातील शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोशनी पारधी यांनी गाेदामासाठी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे यांच्याकडे मागणी केली. बारसागडे यांनी देसाईगंज तालुक्यासाठी दोन कृषी गाेदाम निर्मितीचे प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविले. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सभापती रोशनी पारधी यांनी दिली.