शेती मशागतीची कामे लांबणीवर
By admin | Published: June 11, 2017 01:33 AM2017-06-11T01:33:11+5:302017-06-11T01:33:11+5:30
आरमोरी व वडसा वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ‘त्या’ नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे.
रवीवासीयांचे जीवन वाघाच्या दहशतीत : समूहाने जावे शेती मशागतीच्या कामावर
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी व वडसा वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून ‘त्या’ नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी दुसऱ्यांदा शार्पशुटर व वन विभागाचे पथक दाखल झाले असले तरी अद्यापही वाघ जेरबंद झाला नाही. परिणामी रवी गावातील नागरिक अद्यापही वाघाच्या प्रचंड दहशतीत आहेत. विशेष म्हणजे जंगलालगत असलेल्या शेतशिवारात जाऊन एक व दोन इसमाची कामे करण्यासाठी हिंमत होत नसल्याने रवी गावातील खरीप हंगामातील शेती मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत.
लोकमतच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी थेट रवी गावाला भेट देऊन तेथील नागरिकांशी वाघ दहशतीच्या विषयावर चर्चा केली. यावेळी या गावातील नागरिक वाघाच्या दहशतीत कसे जीवन जगत आहेत, याचा उलगडा झाला. रवीवासीयांना ‘त्या’ नरभक्षक वाघाने जवळपास तीनदा दर्शन दिले आहे. महिला तर सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडत नाही.
अरसोडा गट ग्राम पंचायतीअंतर्गत येणाऱ्या रवी गावाची लोकसंख्या ६८२ असून येथे १३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. अरसोडा गट ग्राम पंचायत अंतर्गत मुलुरचेक, रवी व अरसोडा या तीन गावांचा समावेश आहे. अरसोडा गावातील आठ व रवी गावातील तीन असे एकूण ११ सदस्यीय ही ग्राम पंचायत आहे. रवी गावात इयत्ता पहिली ते चवथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्यानंतर इयत्ता पाचवीपासूनचे शिक्षण घेण्यासाठी रवी गावातील विद्यार्थ्यांना आरमोरी तालुका मुख्यालयी सायकलने तसेच बसने जावे लागते. मात्र बस पकडण्यासाठी वडसा मार्गावरील थांब्यावर प्रतीक्षा करावी लागते. सध्या शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी वाघाची अडचण नाही. मात्र २६ जूनपासून सन २०१७-१८ हे शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याने त्यापूर्वी ‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नसला तरी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक वाघाच्या दहशतीने गावालगतच्या शेतशिवारात जाऊन निर्भयपणे काम करण्यास धजावत नसल्याचे रवीवासीयांच्या संवादातून दिसून आले. महिलाही वाघाच्या प्रचंड दहशतीत वावरत आहेत.
पावसाचे दिवस सुरू झाल्याने शेतातील कचरा पेटवून स्वच्छता करण्यासाठी मला शुक्रवारी शेतात जावयाचे होते. मात्र वाघाची भीती कायम असल्याने मी एकटा शेतावर जाऊ शकलो नाही. छोट्या-मोठ्या कामासाठी शेतशिवारात जाण्याकरिता प्रत्येक वेळी दुसरे इसम सोबत येत नाही. वाघ गावालगत फिरण्याची विशिष्ट वेळ नाही. त्यामुळे वाघ आपल्याला के व्हाही दर्शन देऊ शकतो, ही भीती रवी गावातील प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे. वन विभागाने रवी परिसरातील ‘त्या’ नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे, जेणे करून गावातील व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.
- लक्ष्मण कवासे, माजी ग्रा. पं. सदस्य, रवी
वन विभागाकडून मृतकाच्या कुटुंबाला मदत
‘त्या’ नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात माझे वडील ठार झाले. अद्यापही आमचे कुटुंब दु:खातून सावरले नाही. वन विभागाने आमच्या कुटुंबातील सहा सदस्यांच्या नावाने प्रत्येकी १ लाख १६ हजार ६०० रूपये प्रमाणे ६ लाख ९९ हजार रूपये बँकेत जमा केले आहेत. ८० हजार रूपये माझ्या आईच्या नावे आहे व वडीलाचा मृत्यू झाल्यावर तातडीची मदत म्हणून वन विभागाने २० हजार रूपये आमच्या कुटुंबीयांना दिले आहेत. असे एकंदरीत ८ लाख रूपये वन विभागाकडून प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मृतक वामन मरापे यांचा मुलगा सुधीर मरापे यांनी लोकमत प्रतिनिधीला दिली.