अहेरीच्या १०८ रूग्णवाहिकेने वाचविले ६५० रूग्णांचे प्राण
By admin | Published: August 3, 2015 01:02 AM2015-08-03T01:02:34+5:302015-08-03T01:02:34+5:30
अहेरीच्या १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने आरोग्य सेवा पुरवून आतापर्यंत अहेरी उपविभागातील ६५० हून अधिक रूग्णांचे प्राण वाचविले आहे.
आरोग्य सेवेचा लाभ : २० गरोदर मातांची रूग्णवाहिकेतच प्रसूती
प्रतीक मुधोळकर अहेरी
अहेरीच्या १०८ टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने आरोग्य सेवा पुरवून आतापर्यंत अहेरी उपविभागातील ६५० हून अधिक रूग्णांचे प्राण वाचविले आहे. त्यामुळे १०८ रूग्णवाहिका सेवा अहेरी उपविभागासाठी वरदान ठरली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून गतवर्षीपासून १०८ रूग्णवाहिकेची सेवा अहेरी उपविभागात सुरू करण्यात आली आहे. अहेरीच्या १०८ रूग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिवेंद्र कटरे रूग्णवाहिका चालक महेश ताटकलवार व कर्मचारी रामेश्वर कुंभमवार या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना सेवा देत आहेत. गरोदर मातांची प्रसूती, अपघातग्रस्त रूग्णांना लाभ या रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दिले जात आहे. विशेष म्हणजे, १०८ रूग्णवाहिकेत २० हून अधिक गरोदर मातांची प्रसूती करण्यात आली. या रूग्णवाहिकेच्या सेवेसाठी विविध नियम आहेत. १०८ रूग्णवाहिकेला बोलाविण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करावा लागतो. त्यानंतर डॉक्टरांना यांची माहिती देऊन रूग्णवाहिकेस रूग्णापर्यंत पोहोचविल्या जाते. अहेरी उपविभागातील दुर्गम व अतिसंवेदनशिल भागातील सर्पदंश, प्रसुती, अपघात, नैसर्गिक आपत्ती, हृदयविकार, लकवा आदीसह विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना या रूग्णवाहिकेतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळेवर आरोग्य सेवा पुरविली आहे. १०८ रूग्णवाहिकेच्या आरोग्य सेवेसाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. उमाटे, डॉ. हकीम सहकार्य करीत आहेत.
वर्षभरात ७० हजार किमीचा प्रवास
अहेरीच्या १०८ रूग्णवाहिकेने जुलै २०१४ पासून तर ३१ जुलै २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत जवळपास ७० हजार किमीचा प्रवास करून रूग्णांना आरोग्य सेवा पुरविली आहे. पुणेच्या १०८ रूग्णवाहिकेच्या प्रशासकीय चमूने अहेरीच्या रूग्णवाहिकेने केलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला व आरोग्य सेवेवर समाधान व्यक्त केले.