अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा

By admin | Published: May 19, 2016 01:10 AM2016-05-19T01:10:44+5:302016-05-19T01:10:44+5:30

अहेरी, आलापल्ली : अहेरी, आलापल्ली परिसराला बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली.

Aheri, Aapri Palli hit severely | अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा

अहेरी, आलापल्लीला वादळाचा जोरदार तडाखा

Next

घरांवरील टिनपत्रे व कवेलु उडाले : वन वसाहतीतील घरांचे सर्वाधिक नुकसान
अहेरी, आलापल्ली : अहेरी, आलापल्ली परिसराला बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे आलापल्ली येथील वन वसाहतीतील ३० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
दिवसभर कडाक्याचे ऊन पडलेली असताना अचानक सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळाला सुरूवात झाली. याचा सर्वात मोठा फटका आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या वन वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांना बसला. निवासस्थानावरील टिनपत्रे उडून गेल्याने त्यांच्या घरातील अन्न, धान्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व इतर सर्व साहित्य पावसाने भिजले. टिनपत्रे उडाल्याने कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. सिरोंचा वन विभागाच्या वर्कशॉपसमोर मोठे वृक्ष कोलमडून पडले. तेथे ११ कर्मचारी राहत होते.
सर्वच कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. राजू इल्लुरकर या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखा आलापल्लीसमोर वृक्ष कोलमडल्याने मुख्य प्रवेशद्वार बंद झाले. तसेच बसस्थानक परिसरातील एका झाडाची फांदी मुख्य लाईनवर पडली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वारासमोर मुख्य मार्गावरच मोठे वृक्ष कोलमडून पडल्याने काही वाहतूक विस्कळीत झाली होती.
अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने वादळाच्या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाला. अचानक आलेल्या वादळामुळे आलापल्लीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागेपल्ली शहरालाही वादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

कवेलू काढून टिनपत्रे टाकले
वन वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांवर यापूर्वी कवेलु टाकण्यात आले होते. वादळ झाल्यास कवेलुच्या घराचे फार मोठे नुकसान होत नाही. मात्र ज्या शासकीय निवासस्थानांची डागडुजी करण्यात येत आहे, त्या निवासस्थानावरील कवेलु काढून टिनपत्रे लावली जात आहेत. टिनपत्रे लावण्यासाठी अकुशल कामगारांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे टिनपत्रेही व्यवस्थित लावली जात नाही. त्याचबरोबर कवेलुच्या तुलनेत टिनपत्रे उडून जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. शासकीय निवासस्थानांच्या डागडुजीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे व निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. हे या वादळामुळे झालेल्या नुकसानीतून सिध्द झाले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास लाखोंचा गैरव्यवहार समोर येणार असल्याची प्रतिक्रिया वन कर्मचाऱ्यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.

अहेरी पोलीस स्टेशनसमोर झाड कोसळले
अहेरी येथे सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास वादळाला सुरूवात झाली. या वादळात अहेरी पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेले झाड कोसळले. पावसापासून बचाव करण्याकरिता दोन पोलीस कर्मचारी झाडाखाली थांबले होते. तेच झाड कोसळले. प्रभाग क्रमांक १२ मधील सतीश तोडेटी यांच्या घरावरील छत पूर्णत: उडून गेले. पॉवर हाऊस मार्गावरील राजगाटासमोर व अहेरी उपजिल्हा रूग्णालयासमोरसुध्दा अनेक झाडे कोसळली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने अहेरीचा वीज पुरवठा खंडीत झाला.

पेरमिलीतही वादळामुळे नुकसान
अहेरी तालुक्यातीलच पेरमिली परिसरात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वादळ व पाऊस सुरू झाला. वादळामुळे जंगलातील झाडे कोसळून पडली. अनेक घरांमधील कवेलु, टिनपत्रे उडून गेली. सहा महिन्याची चिमुकली झोपडीत झोपली असताना झोपडीवर झाड कोसळले. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पावसानंतर पेरमिली परिसरातील ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.

Web Title: Aheri, Aapri Palli hit severely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.