अहेरी बस आगाराला ३.५ कोटींचा नफा

By admin | Published: May 24, 2016 01:34 AM2016-05-24T01:34:26+5:302016-05-24T01:34:26+5:30

दरवर्षीच्या तोट्यामुळे एसटी महामंडळ अडचणीत आले असताना अहेरी आगाराने मात्र २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे ३ कोटी ५७ लाख रूपयांचा नफा कमविला आहे.

Aheri bus earning a profit of Rs 3.5 crores | अहेरी बस आगाराला ३.५ कोटींचा नफा

अहेरी बस आगाराला ३.५ कोटींचा नफा

Next

३३ कोटी ६६ लाखांचे उत्पन्न : इतर आगारांसाठी प्रेरणादायी
विवेक बेझलवार अहेरी
दरवर्षीच्या तोट्यामुळे एसटी महामंडळ अडचणीत आले असताना अहेरी आगाराने मात्र २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे ३ कोटी ५७ लाख रूपयांचा नफा कमविला आहे. दुर्गम भागात बस चालत असतानाही आगाराने नफा कमविल्याने राज्यभरातील तोट्यात चालणाऱ्या इतर आगारांसाठी अहेरी आगार प्रेरणादायी ठरले आहे.
अहेरी आगारात एकूण ८८ बसेस आहेत. या आगारात एकूण १३२ वाहक, १३८ चालक व बसची देखभाल तसेच दुरूस्ती करण्यासाठी ३५ यांत्रिकी कर्मचारी कार्यरत आहेत. २०१४-१५ मध्ये या आगारातील बसगाड्या १ कोटी २ लाख ९८ हजार किमीचे अंतर धावल्या होत्या. २०१४-१५ मध्ये ३१ कोटी ९२ लाख रूपयांचा उत्पन्न प्राप्त झाला होता. खर्च वजा जाता ३७ लाख ८४ हजार रूपये नफा झाला होता. २०१५-१६ मध्ये आगारातील वाहक, चालक व इतर यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध व चांगल्या कामगिरीने प्रवाशांच्या संख्येत वाढ केली. त्यामुळे आगाराचा भारांक वाढला. त्याचबरोबर खर्चात कशी कपात करता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले. २०१५-१६ या आर्थिक वर्षात या आगारातील संपूर्ण बसेस १ कोटी ४ लाख किमीचे अंतर धावल्या. वर्षभरात ३३ कोटी ६६ लाख रूपयांचे उत्पन्न झाले. खर्च वजा जाता ३ कोटी ९५ लाख रूपयांचा नफा झाला. २०१४-१५ च्या तुलनेत १ लाख किमी अंतर जास्त धावून १ कोटी ७४ लाख ८२ हजार रूपयांचे अधिकचे उत्पन्न मिळविले. त्यामुळे एकूण नफ्यात वाढ होण्यास फार मोठी मदत झाली आहे.
खासगी प्रवासी वाहनांसोबत स्पर्धा करताना राज्यभरातील एसटी मागे पडत आहे. त्यामुळे एसटीला दरवर्षी तोटा सहन करावा लागत आहे. नफ्यामध्ये असणारी आगारांची संख्या राज्यभरात बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यात अहेरी आगाराने आपले स्थान कायम ठेवले आहे. अहेरी आगारातील बहुतांश बसेस दुर्गम भागात पाठविल्या जातात. मुख्य मार्गाच्या तुलनेत या मार्गांवर प्रवाशांची संख्या कमी आहे. अशाही परिस्थित वेळ, योग्य नियोजन, अनावश्यक खर्चात कपात यासारख्या बाबींचा ताळमेळ जोडत अहेरी आगाराने नफा कमविला आहे.
एका आदिवासीबहुल जिल्ह्यातील आगार जेव्हा नफ्यात आहे, या आगाराच्या कामगिरीपासून इतर आगारांनी निश्चितच धडा घेण्याची गरज आहे. अहेरी आगाराप्रमाणे इतर आगारातील कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले तर एसटीचे तोट्यात रूतलेले चाक बाहेर निघण्यास वेळ लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

१५ शिवशाही बसेस येणार
अहेरी आगाराला १५ नवीन शिवशाही बसेस (वातानुकुलीत) उपलब्ध होणार आहेत. या बसेस शिर्डी, शेगाव, माहूर, अमरावती या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. हैद्राबादकरिता पुशबॅक निमआराम बस उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर अहेरी ते शिर्डी ही बस १ हजार ७६४ किमी अंतर ये-जा करीत आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात लांब पल्ल्याची बसफेरी आहे.

गर्दीच्या हंगामात २ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न
एप्रिल महिन्यामध्ये लग्नसराई सुरू होते. त्यामुळे या महिन्यात प्रवाशांची संख्या वाढते. काही बसेस वरातीसाठी भाड्याने घेतल्या जातात. २०१५ मध्ये एप्रिल महिन्यात एसटीने २ कोटी ७६ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते व आगाराला १५ लाख ८८ हजार रूपयांचा नफा झाला होता. २०१६ मधील एप्रिल महिन्यात २ कोटी ८८ लाख ६१ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून खर्च वजा जाता ३७ लाख ९६ हजार रूपयांचा नफा आगारास मिळाला आहे. २०१४-१५ च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये ३६ हजार किमीचा कमी प्रवास करूनही १२ लाख २८ हजार रूपयांचे उत्पन्न वाढवून नफ्यामध्ये २५ लाख १२ हजार रूपयांची भर घातली होती. मागील वर्षीच्या तुलनेत चालक व वाहकांची संख्या कमी झाली असतानाही नियोजनामुळे उत्पन्नात मात्र भर पडली आहे. गर्दीच्या हंगामाचा पुरेपूर लाभ अहेरी आगाराने घेतला आहे.

विमा संरक्षणामुळे प्रवाशी वाढणार
१ एप्रिल २०१६ पासून एसटीने प्रत्येक प्रवाशामागे एक रूपया अतिरिक्त घेण्यास सुरुवात केली आहे. या जमा होणाऱ्या निधीतून एसटी प्रवाशांना सुमारे १० लाख रूपयांचे विमा संरक्षण दिले आहे. यापूर्वी विमा केवळ तीन लाख रूपये होता. मात्र १ एप्रिल पासून एसटी विभागाने विम्यामध्ये तीनपटीने वाढ केली आहे. या विमा संरक्षणामुळे एसटीकडे प्रवाशी आकर्षित होऊ लागला आहे. अपघांतामुळे लांब प्रवासासाठी प्रवाशी खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीची निवड करीत आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात एसटीचे उत्पन्न आणखी वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Aheri bus earning a profit of Rs 3.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.