अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:56 AM2017-10-05T00:56:56+5:302017-10-05T00:57:07+5:30

जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे.

Aheri committed to development of city and area | अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीच्या दसरा महोत्सवाची थाटात सांगता

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे. अहेरी शहरासह विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
अहेरी येथे आयोजित ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते. संपूर्ण महाराष्टÑात प्रसिद्ध असलेल्या अहेरी येथील दसरा महोत्सवात घटस्थापनेपासून सतत नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची पालखी काढण्यात आली. ना.आत्राम पालखीत बसून जनतेला अभिवादन करीत गडदेवीची पूजा करायला अहेरीलगतच्या गडअहेरी येथे पोहोचले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आपट्याचे पाने सोने म्हणून वाटण्यास प्रारंभ झाला. अहेरीच्या दसरा महोत्सवाला २०० वर्षांची परंपरा लाभली असून ना. आत्राम यांनी सुरुवातीला रूढी, परंपरा व संस्कृतीविषयी सविस्तर माहिती दिली. राजामाता रूख्मिणीदेवीच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादाने आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अहेरीचा दसरा महोत्सव हा केवळ राजपरिवाराचा नसून राजपरिवारावर प्रेम करणारा सर्व जनतेचाही आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने राजमाता रूख्मिणीदेवी, अवधेशबाबा आत्राम उपस्थित होते.
दरम्यान जनतेला संबोधित करताना ना. आत्राम म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर अमडेली गावात वीज एकाचवेळी पोहोचली. आपण स्वत: महामंडळाच्या एसटीने अमडेली गावात प्रवास करीत पोहोचलो. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तेथील नागरिकांनी गावातील विविध समस्या आपल्या पुढे मांडल्या.
वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो, कोणतीही समस्या ही एकाचवेळी मार्गी लागणार नाही. पुढील दोन वर्षात आपण या समस्या दूर करण्यासाठी शासनस्तरावर निधीची तरतूद करून त्या मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण करू, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात आपण अहेरी शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर दसरा महोत्सवाला जवळपास २० हजारवर नागरिक उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यासह गडचिरोली व विदर्भातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्थेसाठी होता.
अहेरी जिल्ह्याची घोषणा होणार
स्वतंत्र अहेरी जिल्हा करण्यात यावा, ही आपली फार जुनी मागणी आहे. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न येत्या काही दिवसात साकार होणार आहे. स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती होण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असून तशी तयारीही शासनाने चालविली आहे. यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यापूर्वी अहेरी शहराचा विकास करण्यासाठी आपण गतीने प्रयत्न करू, असे ना. अम्ब्रिशराव आत्राम यावेळी म्हणाले.
वनावर आधारित उद्योग निर्मिती करू
गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून अहेरी उपविभागाचा अधिकाधिक भाग जंगलव्याप्त आहे. या जिल्ह्यात पर्यावरण व वनावर आधारित उद्योग निर्मितीला चांगला वाव आहे. पर्यावरणाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी वनावर आधारित उद्योग निर्माण करण्यात येतील, असेही ना. आत्राम यांनी यावेळी आश्वासित केले.

Web Title: Aheri committed to development of city and area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.