अहेरीच्या टीएचओवर अदखलपात्र गुन्हा दाखल
By admin | Published: June 2, 2016 02:51 AM2016-06-02T02:51:40+5:302016-06-02T02:51:40+5:30
अहेरी तालुक्यातील कमलापूर आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका मंजुळा मंसाराम सडमाके यांनी अहेरीचे ...
गैरवर्तणूक प्रकरण : आरोग्य सेविकेची तक्रार
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेविका मंजुळा मंसाराम सडमाके यांनी अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांच्या विरूद्ध १८ मे रोजी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. शिवराम कुमरे यांच्या विरोधात कलम ५०४ व ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारकर्त्या आरोग्यसेविका सडमाके यांच्या लेखी तक्रारीवरून सदर प्रकरण अदखलपात्र असल्याने सदर तक्रारकर्त्या आरोग्यसेविकेने न्यायालयात दाद मागावी, अशी समज पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोग्य सेविकेने म्हटले होते की, २००३ पासून आपण आरोग्य सेविका पदावर कार्यरत आहो. १४ आॅगस्ट २००५ पासून मांडरा रुग्णालयात कार्यरत आहे. तालुका आरोग्य अधिकारी कारण नसताना जिथे जिथे भेटतात तेथे तेथे मी तुला नोकरी करू देणार नाही, तसेच तु नोकरी कशी करते, मी पाहुण घेईल, अशी धमकी देत असतात. आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कर्मचारी असल्याने आपण आजपर्यंत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली नाही.
१६ मे रोजी अहेरी पंचायत समितीतील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे, डॉ. पांढरे तसेच महागाव व जिलमगट्टाचे डॉक्टर उपस्थित होते. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अर्भक मृत्यूबाबत आपल्याला उलटसुलट प्रश्न विचारून १२.३० वाजतापासून ५ वाजेपर्यंत उभे ठेवले. पाणी पिण्याची व औषध घेण्याची परवानगी मागितली असता, शिविगाळ केली, असेही तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)