शुद्ध पाण्याबाबत अहेरी असंवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:37 AM2017-07-18T00:37:12+5:302017-07-18T00:37:12+5:30

आरोग्य टिकविण्यासाठी माणसाला शुध्द पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक गावांमध्ये गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

Aheri insensitive to clean water | शुद्ध पाण्याबाबत अहेरी असंवेदनशील

शुद्ध पाण्याबाबत अहेरी असंवेदनशील

Next

सर्वाधिक प्रमाण : सहा महिन्यांत ५४२ पाणी नमुने दूषित
दिलीप दहेलकर । लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरोग्य टिकविण्यासाठी माणसाला शुध्द पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक गावांमध्ये गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, दूषित पाण्याच्या बाबतीत अहेरी तालुका सर्वाधिक संवेदनशील आहे. गेल्या सहा महिन्यात या तालुक्यात दूषित पाण्याचे १७२ नमुने आढळले असून दूषित पाण्याचे प्रमाण १८.९ आहे.
दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, हगवन, टायफाइड, काविळ आदी आजार नागरिकांना होतात. तसेच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासंदर्भात विशेष काळजी न घेतल्यास विविध प्रकारचे जलजन्य आजारही बळावतात. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना शुध्द पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र या जबाबदारीकडे अनेक ग्रामपंचायत दुर्लक्ष करतात. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीच्या गावात दूषित पाण्याचे प्रमाण अधिक आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व तालुकास्तरावरही दर महिन्याला गावातील पाणी नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. १ जानेवारी ते ३० जून २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातून तपासणीकरिता एकूण १३ हजार ३२७ पाणी नमुने घेण्यात आले. यापैकी ५४२ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ३९, धानोरा १४०, आरमोरी ५७, देसाईगंज ३, कुरखेडा ५१, कोरची ३२, चामोर्शी ३६, मुलचेरा १२ व अहेरी तालुक्यातील १७२ नमुन्यांचा समावेश आहे. गेल्या सहा महिन्याच्या पाणी नमुने तपासणी अहवालाची पाहणी केली असता, दूषित पाण्याचे सर्वाधिक प्रमाण अहेरी तालुक्यात आहे. त्यानंतर धानोरा व कुरखेडा तालुक्यात आहे. गडचिरोली तालुक्यात १.९५ तर धानोरा ७.४०, आरमोरी २.३४, देसाईगंज ०.२९, कुरखेडा ६.९४, कोरची ४.१०, चामोर्शी २.६२, मुलचेरा तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण ४.५ आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूषित पाण्याचे प्रमाण सरासरी ४.७ आहे.

जून महिन्यात मूलचेरा तालुका सर्वाधिक दूषित
गेल्या सहा महिन्यात दुषित पाण्याचे प्रमाण अहेरी तालुक्यात सर्वाधिक असले तरी जून महिन्यात या तालुक्यात एकही नमुना दुषित आढळला नाही. मात्र मूलचेरा तालुक्यात दूषित पाणी वाढले आहे.

अहेरी उपविभागातील तीन तालुक्यात दूषित पाणीच नाही
अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड या तालुक्यातील पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. मात्र जानेवारी ते जून २०१७ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकही पाणी नमुना दूषित आढळून आला नाही. या तीन तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण शून्य दाखविण्यात आले आहे.
जून महिन्यात गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, चामोर्शी व मुलचेरा या आठ तालुक्यात एकूण ५४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.

ग्रामपंचायत प्रशासन व गावाच्या उदासीनतेमुळे जलस्त्रोताजवळचा परिसर अस्वच्छ राहतो. शुध्द पाणी पुरवठ्यासाठी विहीर, हातपंप व पाणी योजनेच्या टाकीत ब्लिचिंग पावडर नियमित टाकणे गरजेचे आहे. मात्र ब्लिचिंग पावडर टाकण्यात अनियमितता असल्याने गावात अशुध्द व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
- के.आर. घोडमारे,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प.गडचिरोली

Web Title: Aheri insensitive to clean water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.