अहेरीत कोया पुनेम पेरसापेन उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:23 PM2018-12-17T22:23:21+5:302018-12-17T22:23:40+5:30
आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आदिवासी समाज संघटित असला तर या समाजाचा विकास कोणीच रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. अहेरी येथील धरमपूर वॉर्डात कोया पुनेम जय पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच गंगाराम कोडापे होते. याप्रसंगी जि. प. च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, सांबय्या करपेत, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, सरपंच बालाजी गावडे, नगरसेवक शैलेश पटवर्धन, एम. बी. कुसनाके, मारोती आत्राम, लक्ष्मीबाई कुळमेथे, पुनेम प्रचारक शंकर आत्राम, प्रदीप सडमेक, बुधाजी सिडाम उपस्थित होते.
पुढे बोलतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, आदिवासी समाज हा मूळनिवासी असून जल, जंगल, जमीनचे संवर्धन करूनही समाजाची आज दयनीय अवस्था आहे. पुढच्या पिढीकरिता ही धोक्याची घंटा आहे. अहेरी येथे क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा पुतळा उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. समाजासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांकडून प्रेरणा घेऊन त्या दिशेने प्रत्येकांनी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आदिवासी समाजाचा एक फार मोठा इतिहास असून पूर्वजांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करावे व युवक आणि युवतींनी उच्च शिक्षण घेऊन स्वत:सह समाजाची प्रगती साधावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदिवासी परंपरा व संस्कृतीनुसार ढोल ताशांच्या निनादात रॅली काढण्यात आली. त्यानंतर कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्तीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आला. तसेच सामूहिक पूजन करण्यात आले.
कोया पुनेम पेरसापेन, सल्ला गांगरा शक्ती व आदिवासी समाजाच्या सप्तरंगी झेंड्यासाठी जागा दान केल्याबद्दल धरमपूर वॉर्डातील राजू कुसराम यांचा समाजाच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सत्यनारायण कोडापे, संचालन महेश मडावी तर आभार रुपेश गावडे यांनी मानले. यावेळी आदिवासीबांधव उपस्थित होते.