अहेरीत नगराध्यक्षा-मुख्याधिकारी वाद पोलिसांत; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 04:34 PM2023-04-07T16:34:07+5:302023-04-07T16:35:11+5:30
नगराध्यक्षा रोजा करपत व मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती
अहेरी (गडचिरोली) : येथे नगराध्यक्षा रोजा करपत व प्रभारी मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात ५ एप्रिल रोजी कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर नगराध्यक्षा रोजा करपत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन मुख्याधिकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
नगराध्यक्षा रोजा करपत व मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. या वादाने ५ एप्रिल रोजी टोकाचे वळण घेतले. ५ एप्रिल रोजी एका कामासाठी नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावणे धाडले. त्यानंतर मुख्याधिकारी खोत यांनी कक्षात प्रवेश करून सर्व अधिकार माझ्याकडे आहेत, कोणतेही काम असो माझ्या कक्षात येऊन सांगावे, निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे असतात, तुम्ही पदाधिकारी नाममात्र असतात, शासनाने सर्व अधिकार मला दिले आहेत, असे म्हणून त्यांचा अवमान केला. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ केली, असा रोजा करपत यांचा आरोप आहे.
यानंतर करपत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलिस ठाणे गाठले. पो.नि. किशोर मानभव यांना निवेदन देऊन खोत यांच्यावर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश पटवर्धन, बालकल्याण सभापती मीना ओंडरे, बांधकाम सभापती नौरास शेख, नगरसेविका ज्योती सडमेक, सुरेखा गोडसेलवार, विलास सिडाम, विलास गलबाले, प्रशांत गोडसेलवार, महेश बाकेवार, नरेश गर्गम, राकेश सडमेक, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे उपस्थित होते.
मुख्याधिकारी नॉट रिचेबल
दरम्यान, मुख्याधिकारी दिनकर खोत या घटनेनंतर नॉट रिचेबल आहेत. त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. गुरुवारी ते कार्यालयातही आले नव्हते. त्यामुळे खोत गेले कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगराध्यक्षांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- किशोर मानभव, पोलिस निरीक्षक, अहेरी पोलिस ठाणे