अहेरी न.पं.ला मिळणार बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:19 PM2018-01-07T23:19:19+5:302018-01-07T23:19:36+5:30
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली.
विवेक बेझलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली. स्वच्छ सर्वेक्षणातून अहेरी नगर पंचायतीला आता जवळपास एक कोटी रूपयांचे बक्षीस केंद्र शासनाकडून मिळणार आहे.
केंद्र शासनाने शहरी भागात वैयक्तिक शौचालय उभारणी व गावे हागणदारी मुक्तीची चळवळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कामाची पाहणी अनुक्रमे जिल्हा, राज्य व केंद्र या तिनही स्तरावरून करण्यात आली. यात अहेरी नगरपंचायत तसेच इतर नगरपंचायत सुद्धा जिल्हा व राज्य स्तरावर पात्र झाल्या. मात्र केंद्रस्तरीय पथकाने केलेल्या निरीक्षणात अहेरी ही एकमेव नगरपंचायत पात्र झाली आहे. यापूर्वी केंद्रीय पथकाने आरमोरी नगर पंचायत व वडसा नगर पालिकेचे निरीक्षण केले आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या क्वालिटी कॉन्सिल आॅफ इंडियाची (क्यूसीआय) ची नेमणूक करण्यात आली. केंद्र स्तरावरून आलेल्या क्यूसीआयच्या चमूने डिसेंबर २९ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान चार दिवस अहेरी शहराचे सर्वेक्षण केले. वैैयक्तिक शौचालय व हागणदारी मुक्तीच्या मुद्यावर पाहणी करून प्रत्यक्षात माहिती घेतली.
क्यूसीआयच्या चमूने प्रत्यक्ष दौरा करून शहरात तपासणी करीत अहेरी येथील लोकांचे, विद्यार्थ्यांचे, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेतले. त्यामध्ये अहेरी येथील जिल्हा परिषद शाळा, श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालय तसेच विविध प्रभागातील शौचालय ठिकाणी जाऊन पाहणी केली. व्यापारी क्षेत्रात प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्वछता व आरोग्य विषयक चर्चा केली. तेथील शौचालय व इतर जागांची प्रत्यक्षात तपासणी करून व माहिती जाणून घेतली.
अहेरी शहरासाठी ही गोड बातमी असून केंद्रीय पथकाद्वारे अहेरी नगरपंचायतीला केंद्रीय स्तरावर ओडीएफ दर्जा मिळाला. जिल्यातील पहिली नगर पंचायत आहे. न. पं. ला कर्मचाऱ्यांची ६४ पदे मंजूर असताना ६ नियमित व ३ रोजंदारी पद्धतीने कार्य करतात. अशा स्थितीत आमच्या कर्मचऱ्यांनी गुड मॉर्निंग पथक व इतर कामे चांगल्या पद्धतीने केल्याने हा मान आम्हाला मिळाला तसेच सर्व नगसेवकांच्या सहकार्याने हे शक्य झाले.
- डॉ. कुलभूषण रामटेके, मुख्यधिकारी नगरपंचायत, अहेरी