अहेरी, आलापल्लीत मूसळधार पाऊस
By admin | Published: July 11, 2017 12:36 AM2017-07-11T00:36:29+5:302017-07-11T00:36:29+5:30
तब्बल सात ते आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने रविवारपासून जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
आलापल्लीतील वीज पुरवठा खंडीत : कुरखेडा, देसाईगंजातही पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/आलापल्ली : तब्बल सात ते आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने रविवारपासून जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. रविवारी सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस बरसला. सोमवारी दुपारच्या सुमारास अहेरी व आलापल्ली येथे वादळ व वीज गर्जनांसह मूसळधार पाऊस बरसला. तसेच कुरखेडा, देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली.
मूसळधार पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. धान पिकाची पेरणी केल्यानंतर सात ते आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. तसेच तापमान वाढल्याने पऱ्हे व आवत्यांना धोका निर्माण झाला होता. मात्र पावसाने आता पिकास मदत झाली आहे. अहेरी येथे वीज गर्जनसेह मूसळधार पाऊस बरसल्याने उपजिल्हा रूग्णालयाच्या मार्गावर तीन फूट पाणी साचले. त्यामुळे या मार्गावर अनेकांच्या दुचाकी बंद पडल्या. रस्त्यावरील पाणी काही घरांमध्येही शिरले. आलापल्ली येथे वादळासह मूसळधार पाऊस झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्त्यावर प्रचंड पाणीही साचले आहे.