प्रवाह वळविल्याने अहेरीला जलसंकटाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:17 PM2017-12-24T22:17:49+5:302017-12-24T22:18:32+5:30
अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना...
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असलेल्या गावांना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तेलंगणा सरकारच्यावतीने प्राणहिता नदीवर पुलाचे बांधकाम केले जात आहे. या पुलामुळे अहेरी व तेलंगणा राज्य थेट जोडले जाणार असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर व्यवसाय वृध्दिंगत होण्यासाठी फार मोठी मदत मिळणार आहे. यापूर्वी प्राणहिता नदीच्या पाण्याचा प्रवाह अहेरीच्या बाजुने आहे. त्यामुळे अहेरीसह परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना या नदीवर बांधण्यात आल्या आहेत. मात्र पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने नदीचा प्रवाह वळवून तो अगदी नदीच्या मधोमध गेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दोन्ही काठाला विभागत असल्याने अहेरीच्या बाजुने असलेला पाण्याचा प्रवाह आताच कमी झाला आहे.
जानेवारी महिन्यानंतर प्राणहिता नदीची पाण्याची पातळी कमी होते. परिणामीया कालावधीत अहेरीची पाणी पुरवठा योजना कोरड्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजपर्यंत अहेरी शहराला कधीच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला नाही. मात्र प्रवाह वळविल्याने जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कायमचा प्रवाह वळण्याची शक्यता
सद्य:स्थितीत मध्यभागातून पाण्याचा पुरवठा होत आहे. या खोदकामामुळे पावसाळ्याच्या कालावधीत पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजुने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा प्रवाह बदलला तर तो नंतर बदलविणे कठीण होते. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित प्रवाह मूळच्या दिशेने राहिल, यासाठी बदललेला प्रवाह पूर्वीप्रमाणे करून देण्यासाठी कंत्राटदाराला सक्तीचे करावे, अशी मागणी होत आहे.