अहेरी होणार वायफाय राजनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:16 AM2018-06-10T00:16:27+5:302018-06-10T00:16:27+5:30
जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे.
विवेक बेझलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जिल्हा नियोजन व विकास समिती गडचिरोली च्या नाविन्यपूर्ण योजनेतून अहेरी नगरपंचायतीला वायफायची सुविधा उपलब्ध होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार असून यांचा लाभ शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला होणार आहे. सदर योजना कार्यान्वित होणार असल्याने अहेरी राजनगरी ही वायफाय नगरी होणार आहे.
अहेरी नगरी डिजिटल होण्याच्या मार्गावर असून या भागात पाहिजे त्या प्रमाणात इंटरनेट ची सेवा गतिमान नाही. तसेच ही सेवा महागडी असल्याने सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखे नाही. मात्र नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात वायफायची सुविधा निर्माण झाल्यास नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रमुख शासकीय कार्यालये, तसेच विद्यार्थी व नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्स, टेलिमेडीसीन व जलद इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तत्काळ करणे शक्य होईल. अहेरी शहरात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आदीसह विविध कार्यालये आहेत. बाहेर गावावरून येणाºया लोकांना वायफाय सुविधा निर्माण झाल्यानंतर आपली कामे गतिने आटोपता येणार आहे.
नगरातील विविध कार्यालयातील समन्वय साधण्यासाठी एकाच वेळेस व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करणे शक्य होईल. जलद इंटरनेटमुळे सीएससी, महाआॅनलाइन आपले सरकार पोर्टलचे कामे सुद्धा गतीने होईल.
सदर वायफाय योजना जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रयत्नाने अहेरी नगर पंचायतीमध्ये मंजूर झाली आहे. अहेरी शहर डिजिटल होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. वायफाय सुविधेचा उपयोग विद्यार्थी, अधिकारी तसेच जनतेला होणार असून शासकीय कामांना वेग मिळणार आहे.
- हर्षा ठाकरे , नगराध्यक्ष, नगरपंचायत, अहेरी