किचन शेडमध्ये भरते अहेरीची अंगणवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:51 PM2019-07-17T22:51:24+5:302019-07-17T22:51:41+5:30
स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते.
या अंगणवाडीत सहा महिन्यांपासून ते तीन वर्षापर्यंतचे एकूण २९ लाभार्थी आहेत. तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंतचे ४४ लाभार्थी आहेत. गरोदर माता, स्तनदा मातांना मटकी, चवळी, गहू, मूगडाळ, मैसूर डाळ आदी साहित्य वितरित केले जाते. तसेच तीन ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांना अंगणवाडीतून शालेय पोषण आहार व शिक्षण दिले जाते. अंगणवाडीची इमारत कौलारू होती. डागडुजी करण्यासाठी इमारतीवरील फाटे व कवेलु काढण्यात आले आहे. त्यामुळे केवळ भिंती शिल्लक आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना किचन शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. या किचन शेडमध्ये गरोदर मातांसाठी येणारा पोषण आहार ठेवला जातो. विद्यार्थ्यांसाठी अन्नही शिजविले जाते. तसेच त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बसावे सुध्दा लागते. १० बाय १० फुटच्या किचन शेडमध्ये हा सर्व पसारा सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्य इमारतीवर शेड टाकून द्यावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका भाग्यश्री झोडे यांच्यासह पालक व गरोदर मातांनी केली आहे.