जागेअभावी अहेरीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:57+5:30
ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कचऱ्याचे गठ्ठे तयार करून घनकचरा तयार करणे, यासाठी वेट वेस्ट श्रेडर, प्लास्टिक बेलिंग मशीन व पाच ऑटोटिप्पर आदी साहित्य दाखल झाले आहेत. मात्र अहेरी नगर पंचायतीला अद्यापही डम्पिंग यार्ड उपलब्ध झाले नाही. सद्य:स्थितीत अहेरी शहराची लोकसंख्या १८ हजार ५०० पेक्षा अधिक आहे. दररोज चार ते पाच टन घनकचरा नगर पंचायतीमार्फत गोळा केला जातो.
विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी नगर पंचायत कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या मशीन व पाच आॅटो टिप्पर दाखल झाले आहेत. मात्र डम्पिंग यार्डसाठी जागाच मिळत नसल्याने हे साहित्य सद्य:स्थितीत तसेच धूळखात पडून आहे. त्यामुळे अहेरी राजनगरीचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्यातरी वांद्यात आला आहे.
ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कचऱ्याचे गठ्ठे तयार करून घनकचरा तयार करणे, यासाठी वेट वेस्ट श्रेडर, प्लास्टिक बेलिंग मशीन व पाच ऑटोटिप्पर आदी साहित्य दाखल झाले आहेत. मात्र अहेरी नगर पंचायतीला अद्यापही डम्पिंग यार्ड उपलब्ध झाले नाही. सद्य:स्थितीत अहेरी शहराची लोकसंख्या १८ हजार ५०० पेक्षा अधिक आहे. दररोज चार ते पाच टन घनकचरा नगर पंचायतीमार्फत गोळा केला जातो. त्यासाठी एकूण १७ प्रभागात पाच ऑटोटिप्पर, दोन घंटागाडी व एक ट्रॅक्टर उपलब्ध आहे. जवळपास ४९ स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छतेच्या कामावर आहे. कचरा विलगीकरण व स्वच्छतेचे काम नियोजनबद्ध व्हावे, यादृष्टिकोनातून अहेरी नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १६ जुलै २०१९ ला १ कोटी ४ लाख ८३ लाख रुपयांचा डीपीआर मंजूर करण्यात आला. याच निधीतून शहराच्या १७ प्रभागातून कचरा गोळा करण्यासाठी पाच गाड्या व घनकचरा व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक मशीनची खरेदी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. नव्याने दाखल झालेल्या वेट वेस्ट श्रेडर व प्लास्टिक बेलिंग मशीनसह १० हातगाड्यांचा समावेश आहे.
या सर्व साहित्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने जवळपास तीन लाख रुपयांचा निधी खर्च केला. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्प अहवालात ही उपकरणे, मशीन व यंत्र आदींची खरेदी बंधनकारक असलेल्या गर्व्हमेंट ई-मार्केट प्लेस पोर्टलवरून करण्यात आली आहे. आता अहेरी नगर पंचायतीला केवळ डम्पिंग यार्डची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जागेचा शोध सुरू आहे. जागाच उपलब्ध नसल्याने मशीन रिकाम्या पडून राहणार आहेत.
किरायाच्या जागेत टाकला जातो कचरा
अहेरी नगर पंचायतने अडीच हजार रुपये मासिक भाडेतत्वावर आलापल्ली मार्गावरील खासगी जागा भाड्याने घेऊन त्या जागेत हा कचरा टाकला जात आहे. सध्या केवळ कचरा टाकणे सुरू आहे, पण त्याची विल्हेवाट लावण्यास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे हा कचरा जागेवरच सडत आहे. कचरा विलगिकरण व प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मशिनचाही वापर योग्य वेळी न झाल्यास त्या मशिनही कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.
अहेरी नगराकरिता डम्पिंग यार्डसाठी जागेची मागणी शासनदरबारी सातत्याने केली जात आहे. प्रत्यक्ष भेटी व निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. डीपीआरमधील रक्कम परत जाण्याचा धोका व किमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन मशीन व यंत्रांची खरेदी लवकर करून ते आणून ठेवणे आवश्यक होते.
- अजय साळवे, मुख्याधिकारी,
नगर पंचायत, अहेरी