ऐन दिवाळी सणात लालपरी रुसली; 11 दिवसांत 2 काेटींचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 05:00 AM2021-11-08T05:00:00+5:302021-11-08T05:00:29+5:30
गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने अधिकचे उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र संपामुळे ही संधी गमावली आहे. मागील ११ दिवसांपासून एसटी वाहने आगारातच थांबली आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे तसेच इतर मागण्यांसाठी गडचिराेली जिल्ह्यातील अहेरी व गडचिराेली आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टाेबरपासून संप पुकारला आहे. सलग ११ व्या दिवशीही संप सुरूच आहे. संपामुळे गडचिराेली व अहेरी आगाराचे मिळून ११ दिवसात सुमारे २ काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांची कृती समिती तयार करून या समितीच्या नेतृत्वात २८ ऑक्टाेबरपासून संपाला सुरुवात केली. काही मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला हाेता. मात्र विलिनीकरणाच्या मागणीला धरून पुन्हा ३० ऑक्टाेबरपासून संपाला सुरुवात झाली. हा संप अजूनही कायम आहे.
गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्याने अधिकचे उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र संपामुळे ही संधी गमावली आहे. मागील ११ दिवसांपासून एसटी वाहने आगारातच थांबली आहेत.
खासगी वाहनांचे तिकीट दर जैसे थे
एसटीच्या संपाचा गैरफायदा घेऊन खासगी वाहनांचे दर वाढविले जातील, अशी शक्यता वर्तविली जात हाेती. मात्र खासगी वाहतूकदारांनी पूर्वी एवढेच दर कायम ठेवले आहे. गडचिराेली ते नागपूर खासगी एसी वाहनासाठी २५० रुपये तर साधारण वाहनासाठी २०० रुपये भाडे आकारले जात आहे. चंद्रपूरसाठी ११० रुपये, मूल ६० रुपये, सावली ५० रुपये एवढा दर आकारला जात आहे. हा दर पूर्वी एवढाच आहे.
दर दिवशी १८ लाखांचे नुकसान
- गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. अहेरी आगारात एकूण ७८ बसेस आहेत. या आगारातून दरदिवशी जवळपास आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत हाेते. संपामुळे या उत्पन्नावर पाणी फेरल्या गेले आहे.