गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्षपदी अजय कंकडालवार; भाजपा, राष्ट्रवादी सत्तेबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 10:42 PM2020-01-03T22:42:31+5:302020-01-03T22:42:43+5:30
भाजपाच्या ४ सदस्यांनी दगा दिल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले.
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. ५१ पैकी केवळ ७ सदस्यसंख्या असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते आणि विद्यमान जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अखेर बाजी मारत अध्यक्षपद काबिज केले, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे मनोहर कोरेटी विजयी झाले. सर्वाधिक २० सदस्यसंख्या असताना भाजपाला आणि ५ सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाचे गणित जुळविणे शक्य झाले नाही. भाजपाच्या ४ सदस्यांनी दगा दिल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे अजय कंकडालवार यांना २९ तर भाजपाचे नामदेव सोनटक्के यांना २२ आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मनोहर कोरेटी यांना २९ तर भाजपाचे युधीष्ठिर विश्वास यांना २२ मते मिळाली. विजयी गटाकडे काँग्रेसच्या १५ सदस्यांसह आदिवासी विद्यार्थी संघाचे ७ सदस्य होते. याशिवाय भाजपच्या ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ पाटील बोरकुटे हे एक सदस्य, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अतुल गण्यारपवार व वर्षा कौशिक हे दोन सदस्यही त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे त्यांचे संख्याबळ २९ वर पोहोचले.
भाजपाकडे स्वत:चे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तथा ग्रामसभेचे २ सदस्य असे २२ सदस्यांचे संख्याबळ शिल्लक होते. त्यामुळे भाजपाच्या ४ सदस्यांनी दगा दिला नसता तर भाजपचे संख्याबळ जास्त होऊन भाजपाला विजय मिळवणे शक्य झाले असते. भाजपाने आविसंला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण आविसंने अध्यक्षपद आपल्याकडे देऊन उपाध्यक्षपद व काही सभापतीपद तुम्ही ठेवा, असा प्रस्ताव दिला. नागपुरात त्यावर गुरूवारी दुपारपर्यंत मंथन झाले. मात्र भाजपाच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी हा प्रस्ताव मान्य केला नसल्यामुळे भाजपाला सत्तेबाहेर जावे लागले.
दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास निकाल जाहीर होताच आविसं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत जि.प. सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी जि.प.च्या आवारात चांगलीच गर्दी झाली होती. जयघोष करत आतीषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून अभिनंदन स्वीकारल्यानंतर विजयी पदाधिका-यांची ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून मिरवणूक काढण्यात आली.
निवडणुकीप्रसंगी काँग्रेसच्या वतीने निरीक्षक जिया पटेल, अमर व-हाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार धर्मरावबाबा आत्राम, ऋतूराज हलगेकर, भाजपाच्या वतीने खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, मावळत्या जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.