गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे अजित हत्तीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:05 PM2020-06-10T22:05:22+5:302020-06-10T22:05:52+5:30
कमलापूर हत्तीकॅम्प मध्ये एकूण 10 हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच 8 रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. असे एकूण 12 कर्मचारी असून यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने हत्तींना हाताळण्यास अडचण निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: येथील हत्तीकॅम्प मध्ये असलेल्या अजित नावाच्या हत्तीने मागील दोन दिवसांपासून धुमाकूळ घातल्याने येथील कर्मचाऱ्यांना हत्तीला सांभाळणे कठीण झाले आहे. दोन दिवसांपासून जंगलात मुक्काम ठोकल्याने त्याचा शोध घेऊन हत्तीकॅम्प ला आणण्याचा प्रयत्न केले. मात्र,अजित नावाचा हत्ती ऐकण्यास तयार नसल्याचे दिसून आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला तिथेच सोडून आले. अखेर आज अजित हत्तीकॅम्पला परत आला. मात्र, त्याला कंट्रोल करणे शक्य झाले नाही.
कमलापूर हत्तीकॅम्प मध्ये एकूण 10 हत्ती असून त्यांची देखरेख करण्यासाठी चार नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच 8 रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. असे एकूण 12 कर्मचारी असून यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने हत्तींना हाताळण्यास अडचण निर्माण होत आहे.
अजित नावाचा हत्ती नेहमीच चवताळल्यासारखा करत असून त्याला सांभाळणे कठीण होत आहे.नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा अजित हत्ती धुमाकूळ घालत असून कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून जंगलातच मुक्काम ठोकल्याने येथील कर्मचाऱ्यांनी त्याला आणण्याचा प्रयत्न केला.मात्र,ते शक्य झाले नसून कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावत असल्याने त्याला जंगलातच सोडून याव लागला. तिसऱ्या दिवशी स्वत:च परत आला मात्र,कर्मचारी जवळ जाऊ शकले नाही. त्याला मोकाटच सोडावे लागले. रस्त्यावर रहदारी सुरू असल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.यापूर्वी याच हत्तीने येथील कर्मचारी पेंटा आत्राम याला ठार केले होते.त्यानंतर तो याच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर हल्ला केला होता. यामध्ये वाहनधारकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे भीती निर्माण झाली असून वन विभागाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन हत्तीवर नियंत्रन कसे ठेवायचे याबाबत वन विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असतानाही हत्तीला खाऊ घालणारेच कर्मचारी त्यांची देखभाल करताना दिसत आहेत. वास्तविक बघता एका हत्तीच्या मागे एक महावत आणि एक चारा कटर आवश्यक असून इथे फक्त 12 कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर पूर्ण हत्तीकॅम्प अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रिक्तपदे भरून योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा 2013 मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.
हत्तीच्या पायाला जखम झाली असून त्याला इतर हत्तीपासून दूर ठेवण्यात येत आहे. पशु वैदयकीय अधिकारी यांना दाखवून योग्य उपचार घेण्यात येत आहे. परवा मी स्वत: बघितला असून त्यानंतर काय झालं याबाबत मला माहिती नाही. विचारपूस करून माहिती देता येईल.
जे.व्ही.घुगे,वनपरिक्षेत्र अधिकारी-कमलापूर