अकाली पावसाने रबीला तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:33 AM2017-03-11T01:33:38+5:302017-03-11T01:33:38+5:30
गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असल्याने जिल्हाभरातील रबी पिकांना तडाखा बसला आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान : भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात शुक्रवारी जोरदार पाऊस
गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असल्याने जिल्हाभरातील रबी पिकांना तडाखा बसला आहे. तूर लाख, चणा, मूग, उडीद आदी रबी पिकासह भाजीपाला व टरबूज पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उन्हाळी धान पिकालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
गडचिरोली जिल्ह्यात शेततळे, सिंचन विहीर व इतर सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी धानपिकांकडे वळले आहेत. आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्ध्या भागात शेतकरी उन्हाळी धान पीक घेत आहेत. याशिवाय कृषी विभागाने गावागावात जनजागृती घडवून आणल्याने नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविले आहे. वैरागड भागातील शेतकरी ऊस व टरबुजाचे पीक घेत आहे. यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्याने रबी हंगामात लगबगीने विविध पिकांची पेरणी केली. रबी पिके ऐन गर्भात असताना अवकाळी पाऊस जिल्ह्यात बरसला. या पावसामुळे रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली तालुक्यात ७.४ मिमी, धानोरा १२.८ मिमी, चामोर्शीत २३.० मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास भामरागड, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यात पाऊस बरसला. पावसामुळे या तालुक्यातील रबी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यात तोडणीनंतर शेतात वाळत घातलेल्या लाल मिरचीचे पावसामुळे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात पाऊस झाल्याने या रस्त्यावर पाणी दिसत होते. सिरोंचा तालुक्यात आसरअल्ली, अंकिसा परिसरात तसेच कुरखेडा तालुक्यात मालेवाडा, अंगारा, येंगलखेडा आदी परिसरात मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व आता मिरची पिकाचा तोडा अंतिम टप्प्यात आहे. याचवेळी अकाली पाऊस आल्याने शेतात झाकून ठेवलेली व पसरवून ठेवलेली मिरची मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहे. मिरचीच्या ढिगांमध्ये पाणी जमा झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पीक नुकसानीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.
शेतकऱ्यांच्या मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उन्हात वाळविण्यासाठी उघड्यावर असलेली मिरची पूर्णपणे ओली झाली. त्यामुळे मिरचीच्या किमतीतही घसरण होणार आहे. ओल्या झालेल्या मिरचीला बाजारात भाव कमी राहिल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या भागातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- रंगू बापू, प्रगतशील शेतकरी,
अंकिसा ता. सिरोंचा
आंब्याचा मोहर गळाला
गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात आमराया आहेत. सिरोंचा तालुक्यात कलेक्टर आंबाही प्रसिध्द आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठे आंब्याचे झाड असून यावर्षी आंब्याला चांगला बहर आला होता. शहरातही अनेक घरी आंब्याच्या झाडाला बहर आलेला दिसत असताना शुक्रवारी पहाटे अकाली पाऊस झाल्याने संपूर्ण भागात आंब्याचा बहर गळून खाली पडला आहे. त्यामुळे आंबे उत्पादक शेतकऱ्यांनाही या अकाली पावसाचा मोठा फटका बसला आहे. महसूल प्रशासनाकडून अजूनही सर्वेक्षण कामाला सुरूवात झालेली नाही.