गडचिरोलीतील आकाशने लग्नसोहळा केला स्थगित; कोरोना संक्रमण रोखण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 03:24 PM2020-03-25T15:24:13+5:302020-03-25T15:24:39+5:30
देसाईगंज तालुक्यातील कुरुडचा रहिवासी आकाश मारोती राऊत यांनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलले.
अतुल बुराडे/विष्णू दुनेदार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली:
विवाह हा जीवनातील अतीव प्रतीक्षेचा आणि आनंदादायी असा कौटुंबिक, सामाजिक उत्सव होय. विवाह एक संस्कार. प्रत्येक जण विवाहसंस्कार आपआपल्या पध्दतीने जेवढा अविस्मरणीय करता येईल तेवढा प्रयत्न करीत असतो. यासाठी जय्यत तयारी सुध्दा सुरु झालेली असते. आनंदाला उधाण आलेले असते. यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यात होणा?्या लग्न समारंभाच्या आनंदावर मात्र कोरोना साथीच्या आजाराने विरजण घातले आहे. गरीबाच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न म्हटल्या जाते परंतु यावर्षी लग्नसोहळ्यांवर कोरोना विघ्नाने मात्र गरिब व श्रीमंत दोघांनाही समतेची वागून दिली. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिल मध्ये होणारे लग्न पुढे ढकलण्याची पाळी आली. देसाईगंज तालुक्यातील कुरुडचा रहिवासी आकाश मारोती राऊत यांनी दि.२७ मार्चला नियोजित असलेले लग्न पुढे ढकलले. एवढ्यावरच न थांबता आकाशने पाहुणेमंडळींना सोशल मिडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून आप-आपल्या घरी राहत सरकार व प्रशासनाला कोरोनाशी लढण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना आजारामुळे मार्च व एप्रिल महिन्यात होणारे लग्न समारंभ अडचणीत आले आहेत. मार्च महिन्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपूर्ण देशातच जमावबंदी आदेश लागू केला आहे. कोरोनो विषाणू प्रसार रोखण्यासाठी मोठ्या संख्येने एकत्र न येण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहे.
कुरुड येथिल स्व. मारोती राऊत यांचे चिरंजीव आकाश व स्व. हरिश्चंद्र मिसार यांची मुलगी तेजस्विनी (कन्हाळगाव ता. लाखांदूर, जि. भंडारा) हिच्याशी दि. २७ मार्चला कुरुड येथे लग्न संपन्न होणार होता. परंतु देशावरती आलेली आपत्ती लक्षात घेता लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आला. यासाठी वर आकाश यांनी सोशल मिडियावर खास पोष्ट टाकून लग्न पुढे ढकलल्याचे सांगून लग्नाची पुढील तारीख कळविण्यात येईल असे पाहुणेमंडळीला कळविले. सोबतच कोरोना आजारा बाबत काळजी घ्या, सरकार व प्रशासनाला सहकार्य करण्याचे, अनावश्यक वेळी बाहेर पडू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर पडा, स्वच्छ रहा, हात धुवा असे आवाहनही केले आहे.