दारूविक्रेत्यांनी शोधली नवीन शक्कल
By admin | Published: September 11, 2016 01:33 AM2016-09-11T01:33:46+5:302016-09-11T01:33:46+5:30
दारूची वाहतूक करण्यासाठी दारूविक्रेत्यांकडून नेहमीच नवनवीन शक्कल लढविली जाते.
जिमलगट्टातील घटना : तेलाच्या पिप्यात दारूच्या बॉटल्या
जिमलगट्टा : दारूची वाहतूक करण्यासाठी दारूविक्रेत्यांकडून नेहमीच नवनवीन शक्कल लढविली जाते. या नवीन शक्कलीमुळे पोलिसांना चकमा देत दारूविक्रेते त्यांच्यासमोरूनच चारचाकी किंवा दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक करतात. असाच एक नावीण्यपूर्ण प्रकार जिमलगट्टा येथे उघडकीस आला आहे. दारूविक्रेता तेलाच्या टिनात व मिक्सरच्या डब्ब्यात दारूची वाहतूक करीत होता. जिमलगट्टा पोलिसांच्या चाणक्ष नजरेमुळे सदर दारू लक्षात येऊन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अहेरी-सिरोंचा मार्गावरून नेहमीच दारूची वाहतूक केली जाते. त्यामुळे जिमलगट्टा पोलिसांकडून अधूनमधून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अशाच प्रकारे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान समय्या मल्ला दुर्गम रा. सूर्यापल्ली याच्या दुचाकीविषयी पोलिसांना संयश आल्याने पोलिसांनी त्याची दुचाकी थांबविली. त्याच्या दुचाकीवर तेलाचा टिन व मिक्सरचा खोका असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, तेलाचा टिन व नवीन मिक्सर घेतला असून तो आपल्या गावाकडे नेत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी संशय आल्याने या डब्ब्याची तपासणी केली असता, अतिशय शिताफीने दुर्गमने तेलाच्या डब्ब्यासह मिक्सरच्या बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बॉटल भरून ठेवल्या होत्या. दोन्ही डब्बे उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली. पोलिसांनी समय्या दुर्गमच्या विरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
त्याच्याकडील ८६ निपा विदेशी दारू व दुचाकी असा ४० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विवेक सिसाळ, सखाराम बिराजदार व जलद प्रतिसाद पथकाच्या जवांनांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सिडाम करीत आहेत. दुर्गम याची नवीन शक्कल बघून पोलिसही चकरावले. (वार्ताहर)