दारूविक्री करणाऱ्यांना साेयी-सुविधा व याेजनांपासून वंचित ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:27+5:302021-03-06T04:34:27+5:30
जोगीसाखरा ग्रामपंचायतअंतर्गत सालमारा, कनेरी व जोगीसाखरा आदी तीन गावांचा समावेश आहे. जोगीसाखरा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव आहे. सालमारा येथे दोन ...
जोगीसाखरा ग्रामपंचायतअंतर्गत सालमारा, कनेरी व जोगीसाखरा आदी तीन गावांचा समावेश आहे. जोगीसाखरा राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव आहे. सालमारा येथे दोन वर्षांपासून दारूविक्री बंद होती. जोगीसाखरा येथे गाव संघटनेच्या महिलांच्या पुढाकारातून ६ महिने दारूविक्री बंद होती. मात्र, महिलांना ग्रामपंचायतीचा पाठिंबा नसल्याने महिलांची संघटना कोलमडली व पुन्हा दारूविक्री सुरू झाली. परिणामी व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित प्रभारी सरपंचांनी दारूमुक्त गाव निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार प्रभारी सरपंचांच्या पुढाकारातून दारूविक्री मुक्त गाव निर्माण करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच मुजाेरीने दारूविक्री केल्यास संबंधित व्यक्तीला सोयी-सुविधा व योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे मुक्तिपथने स्वागत केले आहे. मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कौतुक केले. सोबतच गावाच्या विकासासाठी घेतलेला ठराव टिकवून ठेवण्यासंदर्भात चर्चा केली. इतर गावांनीसुद्धा दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. मयूर गुप्ता यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य, मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.