राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली वाहनासह दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:41+5:30
एका स्कॉर्पिओ वाहनातून तेलंगणा राज्य निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या येत असताना त्या वाहनाला पकडण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत १०० लिटर हातभट्टीची मोहादारू आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवायांमध्ये १ लाख ३० हजार रुपयांची दारू आणि वाहने मिळून एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्या मार्गाने तेलंगणा व इतर भागातून येणाऱ्या दारू आयातीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शनिवारी पहाटे राबविलेल्या धाडसत्रात एका चारचाकी वाहनासह दोन दुचाकी आणि त्यातून आणली जाणारी विदेशी व हातभट्टीची दारू जप्त केली. या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
सदर कारवाया गडचिरोली आणि मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आल्या. एका स्कॉर्पिओ वाहनातून तेलंगणा राज्य निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ७२० बाटल्या येत असताना त्या वाहनाला पकडण्यात आल्या. दुसऱ्या कारवाईत १०० लिटर हातभट्टीची मोहादारू आणि इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या ९० मिलीच्या ९५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवायांमध्ये १ लाख ३० हजार रुपयांची दारू आणि वाहने मिळून एकूण ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी सुब्रत सतानत गाईन, सुनील रुषीजी कन्नाके दोघेही रा.नवेगाव (गडचिरोली), प्रकाश सोमाजी भोयर रा.गिलगाव ता.चामोर्शी, राहुल विनायक पिट्टलवार रा.रामनगर, गडचिरोली आणि आशिष माणिक खोबे रा.गिलगाव ता.चामोर्शी या पाच जणांना अटक करण्यात आली. तर अमोल उमाजी खोबे रा.गिलगाव हा फरार आहे.
सदर कारवाया राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एन.एस. धुरड, दुय्यम निरीक्षक सी.एम.खारोडे, के.एन. देवरे, सहायक दु.निरीक्षक जी.पी. गजभिये, एस.एम.गव्हारे, व्ही.पी.शेंदरे, व्ही.पी. महाकुलकर आदींनी केल्या.