मद्यपी चालक बेशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:36 AM2021-07-31T04:36:49+5:302021-07-31T04:36:49+5:30
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे ...
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक मद्यप्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.
मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
फवारणीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे.
श्वानांचा बंदोबस्त करा
एटापल्ली : शहरात दिवसेंदिवस मोकाट श्वानांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. श्वानांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या श्वानांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगरपंचायतीकडे केली आहे.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
पीएचसीसाठी इमारत बांधण्याची मागणी
भामरागड : तालुक्यातील लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी रोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी लाहेरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वसा येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागेपल्लीचे दूध शीतकरण केंद्र सुरू करा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र जिल्ह्यात दुधाचे पुरेसे उत्पादन नसल्याने सदर शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
तोडसा येथे भ्रमणध्वनी टॉवर उभारा
एटापल्ली : तालुक्यातील तोडसा येथे बीएसएनएल टॉवर उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एटापल्ली तालुक्यात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन अनेक कामे करावी लागतात. तोडसा परिसरात बीएसएनएलचा कव्हरेज राहत नसल्याने मोठी अडचण होते.
आरमोरी तालुक्यातील रस्त्यांची रुंदी वाढवा
आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागांतील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जातेवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे.
बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागांतील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान-मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यांतील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत नागरिकांवर वन्यपशूंचे अनेक हल्ले झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस वाढला
सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाण निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या खांबाने अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. ते कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्यांची नगरपरिषदेने दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणचे नाले तुडुंब आहेत.
ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : विजेची बचत करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावेत, अशी मागणी आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंबकल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : नगरपालिकेच्या क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.