'चिचडोह'चे सर्व ३८ दरवाजे बंद करणार; पाणीपातळी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:27 PM2024-11-15T14:27:12+5:302024-11-15T14:28:52+5:30

सावधानता बाळगा : नदीकाठावरील गावांना 'जलसंपदा'चे आवाहन

All 38 doors of 'Chichdoh' will be closed; Water level will rise | 'चिचडोह'चे सर्व ३८ दरवाजे बंद करणार; पाणीपातळी वाढणार

All 38 doors of 'Chichdoh' will be closed; Water level will rise

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्याकरिता सोमवार, १८ नोव्हेंबरपासून सर्व ३८ दरवाजे प्रथम नदीकाठावरील व क्रमाने नदीच्या मध्यभागातील क्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात ऊर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा व पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.


वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झाले. सदर धरण मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस चार किलोमीटर अंतरावर आहे. धरणाची एकूण लांबी ६९१ मीटर असून १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविलेले आहेत. 


नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वैनगंगा व उपनद्यांच्या नदीकाठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी शेतांमध्ये कामे करताना सतर्क राहावे, मासेमारी करणारे व पशुपालकांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये, रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. नदीकाठावर जाणे टाळावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.


नदीवर अंघोळ करणे बेतू शकते जिवावर

  • वाढीव पाणीपातळीमुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून नदीलगतच्या सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे; तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी.
  • मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर अंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे.


या गावांना आहे धोका 
जिल्ह्यातील कुरूड, रामपूर, विसापूर, निमगाव, खोर्दा, हिवरगाव, तळोधी मोकासा, कुनघाडा, नवेगाव (रै.), आमगाव माल, दर्शनी माल, येवली, मार्कंडा, घारगाव, फराडा, दोटकुली, डोंगरगाव (बु.), शिवणी, मुडझा (बु.), पुलखल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हरांबा, कढोली, उमरी, काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली, वढोली चक, पेडगाव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगाव, कापसी, उपरी, आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

Web Title: All 38 doors of 'Chichdoh' will be closed; Water level will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.