आलदंडीत नवे पोलीस ठाणे उभारले
By admin | Published: April 23, 2017 01:26 AM2017-04-23T01:26:59+5:302017-04-23T01:26:59+5:30
एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी
अतिसंवेदनशील भाग : नक्षलवाद्यांना शह देण्याचा उद्देश
एटापल्ली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी शनिवारला नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. जनतेचे संरक्षण करणे व नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी एटापल्लीपासून १० किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले.
आलदंडी गाव व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते आलदंडी येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. तसेच पोलीस मदत केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाकरिता प्रस्तावित जागेवर भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने आलदंडी येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित महिलांना साडी व पुरूषांना ड्रेस तसेच शेतकऱ्यांनी शेतीपयोगी साहित्य आणि युवकांना खेळाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे कमांडर त्रिपाठी, आलदंडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे आदींसह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
याच महिन्यात मागील आठवड्यात पोलीस प्रशासनाने एटापल्ली-अहेरी मार्गावर येलचिल येथे नवे पोलीस मदत केंद्र स्थापन केले. या नव्या मदत केंद्रांमुळे नक्षली कारवायांवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठे यश येण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात पोलीस ठाण्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)