गडचिरोली न.प.मध्ये सर्वपक्षीय सरकार
By admin | Published: January 3, 2016 01:56 AM2016-01-03T01:56:56+5:302016-01-03T01:56:56+5:30
गडचिरोली नगर पालिकेत विषय समिती सभापतिपदी काँग्रेस, राकाँ, भाजप व पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती आघाडीच्या नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली आहे.
देसाईगंजमध्ये जुनेच पदाधिकारी कायम : कात्रटवारांसह नव्यांना संधी
गडचिरोली/देसाईगंज : गडचिरोली नगर पालिकेत विषय समिती सभापतिपदी काँग्रेस, राकाँ, भाजप व पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती आघाडीच्या नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली आहे. बांधकाम समितीच्या सभापतीपदी प्रा. राजेश कात्रटवार तर आरोग्य समिती सभापतिपदी रमेश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. देसाईगंज नगर पालिकेत विद्यमान सभापतींना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित सभापतींना केवळ १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
गडचिरोली नगर पालिकेत उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. सुरुवातीला पीठासीन अधिकाऱ्यांनी सभा बोलाविण्याचा हेतू व नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या नगरसेवकांची नावे वाचून दाखवली. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र, सहमतीच्या राजकारणाचा भाग म्हणून या नगर परिषदेत पूर्वाश्रमीची युवाशक्ती संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजप अशी सर्वपक्षीय आघाडी झाल्याने व प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज असल्याने सर्व सभापतीची अविरोध निवड झाली. त्यानुसार शिक्षण समितीचे सभापती म्हणून राकाँचे नगरसेवक विजय गोरडवार, बांधकाम समितीचे सभापती म्हणून पूर्वाश्रमीचे युवाशक्ती आघाडीचे नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार, तर नियोजन व विकास समितीच्या सभापती म्हणून भाजपच्या नगरसेवका बेबीताई चिचघरे यांची अविरोध निवड झाली. तर काँग्रेसचे नगरसेवक नंदू कायरकर यांची पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणून निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती आघाडीच्या नगरसेविका शारदा दामले, तर उपसभापती म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका संध्या उईके यांची निवड झाली.
देसाईगंज येथे बांधकाम सभापती म्हणून न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल गोबुमल कुकरेजा यांची निवड करण्यात आली. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदी सय्यद आबिद अली तुराब अली यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शालू दिवाकर दंडवते तर शिक्षण समितीच्या सभापती पदी विलास नामदेव साळवे यांची अविरोध निवड झाली. पहिल्या वेळी सभापती पदावर असलेले मनोज खोब्रागडे यांना यावेळी पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदावर विराजमान करण्यात आले आहे. येथे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे व सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)