करवाढीविरोधात आरमोरी नगर परिषदेवर सर्वपक्षीय आक्षेप मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:00 AM2020-12-10T05:00:00+5:302020-12-10T05:00:29+5:30
नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरमोरी शहराच्या विकासाच्या नावावर शहरातील मजबूत रस्ते व नाल्या तोडून नव्याने बांधण्याचा ठेकेदारी निर्णय घेऊ नये, शहराच्या विकासासाठी मिळालेला पैसा व्यर्थ खर्च करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : नगर परिषदेने नव्याने केलेली कर आकारणी आणि करवाढ रद्द करून जुनीच करप्रणाली कायम ठेवण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आक्षेप मोर्चा बुधवारी आरमोरी नगरपरिषदेवर धडकला.
मोर्चाची सुरूवात जिवानी राईस मिलपासून करण्यात आली. सदर मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने निघून आझाद चौक, गायकवाड चौक ते गांधी चौक गुजरीमार्गे मुख्य चौकातून नगरपरिषदेवर धडकला. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हरिराम वरखडे, शिवसेनेचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी. राष्ट्रवादीचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे, भाकपचे जिल्हा सचिव डॉ.महेश कोपूलवार, माकपचे अमोल मारकवार, प्रहारचे निखिल धार्मिक यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी केले.
नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरमोरी शहराच्या विकासाच्या नावावर शहरातील मजबूत रस्ते व नाल्या तोडून नव्याने बांधण्याचा ठेकेदारी निर्णय घेऊ नये, शहराच्या विकासासाठी मिळालेला पैसा व्यर्थ खर्च करू नये अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मोर्चा नगरपरिषदेवर पोहचल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चेकरांचे निवेदन नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवाणी व मुख्याधिकारी माधुरी सलामे यांनी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येऊन स्विकारले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने न.प.चे पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
या मोर्चात पीरिपा, प्रहार जनशक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि युवारंग संघटनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
मोर्चात संदीप ठाकूर, अमीन लालानी, निखिल धार्मिक, राजू गारोदे, सुदाम मोटवानी, अशोक वाकडे, नगरसेवक मिलींद खोब्रागडे, नगरसेविका दुर्गा लोणारे, चंदू वडपल्लीवार, वेणूताई ढवगाये, राजू अंबानी, देवराव चवळे, विनोद झोडगे, अड. जगदीश मेश्राम, प्रशांत सोमकुवर, भिमराव ढवळे, प्रकाश खोब्रागडे, कल्पना तिजारे, मेघा मने आदी अनेक जण प्रामुख्याने सहभागी झाले होते.