हैदर शाह बाबांच्या दर्गावर सर्वधर्मीय होतात नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:17 PM2024-07-01T18:17:29+5:302024-07-01T18:18:10+5:30
Gadchiroli : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान
गडचिरोली : बाबा वली हैदर शाह हे सिरोंचा येथे इस १६९८ मध्ये आले. आल्यानंतर त्यांनी प्राणहिताकिनारी विठ्ठलेश्वर मंदिराजवळ नमाज पठण करण्याकरिता आणि पवित्र दर्गा तयार करण्याकरिता जागा निवडली पाहता-पाहता सुरुवातीला या ठिकाणी लहान किल्ला तयार करण्यात आला. त्यात दर्गा बाबांच्या निगराणीखाली तयार होऊ लागला. दर्गा तयार झाल्यावर बाबा नित्यनेमाने पात नमाज पठण करू लागले. साफसफाई, पूजा-अर्चा व इतर धार्मिक कार्ये पार पाडण्याची जबाबदारी मुस्लीम समाजाकडे सोपवून बाबांनी दर्गात चिरविश्रांती घेतली. या दर्गाला परिसरातील सर्व जाती, धर्मातील भाविक भेट देऊन चादर चढवतात.
तालुक्यातील प्रसिद्ध हजरतबाबा वली हैदर शाह यांच्या वार्षिक उरूसचे आयोजन उरूस कमिटीतर्फे केले जाते. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजता बल्लारशहा येथील संदल शरीफची सुरुवात दरगाहपासून केली जाते. त्यानंतर ती सिरोंचा नगरातील मुख्य मार्गाने फिरत जाऊन शेवटी ती दरगाह शरीफमधून परत येते. त्यानंतर दुय्यम कव्वाली होते. या दरम्यान महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा येथील हिंदू, मुस्लीम, आदिवासी, बौद्ध बांधव मोठ्या संख्येने पूजाअर्चा करण्यासाठी येतात.
काळ्या ध्वजाच्या तुकड्यांबद्दल भाविकांमध्ये अपार आस्था
उर्सच्या दुसऱ्या दिवशी जुन्या काळ्या ध्वजाचे तुकडे करण्यात येतात. ते तुकडे भाविकांना जातात. ते तुकडे भाविक एकद्या छोट्या पेटीत ठेवून ती भुजेला, कंबरेला बांधतात. तुकड्यांची पेटी बांधल्यामुळे बाबांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्यावर कसल्याही प्रकारचे संकट येत नाही. आलेच तर संकटातून मुक्ती होते, असा धार्मिक समज आहे.