विहिरी पूर्ण करण्यासाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:41 PM2018-12-31T22:41:37+5:302018-12-31T22:41:57+5:30
२०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २०१७-१८ या वर्षात जिल्हा परिषदेमार्फत ५५३ विहीर बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४३८ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र ११५ विहिरी अजुनही अपूर्ण आहेत. या विहिरी बांधण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१९ पर्यंत आहे. तोपर्यंत विहीर बांधकाम झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी विहीर बांधकामाची लगबग सुरू केली आहे.
आदिवासी विकास विभागाच्या निधीतून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व समाज कल्याण विभागाच्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. २०१७-१८ या वर्षात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गतसाठी ४३१ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी ४०१ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. ३४६ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काम सुरू न झालेल्या व काम सुरू असलेल्या विहिरी कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च पूर्वी पूर्ण करायच्या आहेत.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी २३ विहिरी मंजूर केल्या. सर्वच विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यापैकी १८ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९९ विहिरी मंजूर केल्या. ८७ विहिरींच्या बांधकामाला सुरूवात झाली. तर ७४ विहिरींचे पूर्ण झाले आहे. मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नसल्याने शासन विहीर बांधकामासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो विहिरी मंजूर केल्या जातात. मंजुरीचे वर्ष पकडले जात असले तरी बºयाच वेळी विहीर मंजुरीस त्यानंतर निधी प्राप्त होण्यास बराच कालावधी जातो. त्यानंतर पावसाळ्याला सुरूवात होते. पावसाळ्यात विहिरीचे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वर्ष उजाडतो. ज्या विहिरींच्या कामाला अजुनही सुरूवात झाली नाही किंवा ज्या विहिरींचे बांधकाम सुरू आहे, अशा शेतकºयांना ३१ मार्च पूर्वी विहीर पूर्ण करण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी विहीर खोदली जाते. त्या ठिकाणची जागा मोकळी झाली असली तरी पोकलँड मशीन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्याचबरोबर रेतीचीही प्रचंड टंचाई असल्याने विहिरींचे काम रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२०१८-१९ मधील काम सुरूच झाले नाही
२०१८-१९ या वर्षात ५७९ विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रांतर्गतमध्ये ४६५, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेरीलसाठी २१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून ९३ विहिरींचा समावेश आहे. या विहिरींसाठी १३ कोटी ९ लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र अजूनपर्यंत एकाही विहिरीला कार्यारंभ आदेश दिला नाही. त्यामुळे याही विहिरींचे काम सुरू होण्याला विलंबच होणार आहे.