आलापल्ली बसस्थानक बनले फ्रुटस्टॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 01:36 AM2016-05-13T01:36:29+5:302016-05-13T01:36:29+5:30
आलापल्ली बसस्थानकासमोर फळविक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या गंभीर प्रश्नाकडे एसटी विभागाचे ...
फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण : प्रवाशांची होत आहे गैरसोय
अहेरी/आलापल्ली : आलापल्ली बसस्थानकासमोर फळविक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या गंभीर प्रश्नाकडे एसटी विभागाचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे.
आलापल्ली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आलापल्ली येथून अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आष्टीकडे जाता येते. त्यामुळे आलापल्ली हे तालुकास्थळ जरी नसले तरी या ठिकाणी प्रत्येक बस थांबते. त्याचबरोबर आलापल्लीवरून ग्रामीण भागासाठीही बसेस सोडल्या जातात. दरदिवशी हजारो प्रवाशी आलापल्ली मार्गे किंवा आलापल्ली येथून प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात बसस्थानक बांधण्यात आले आहे. या बसस्थानकाच्या सभोवताल आजपर्यंत फळविक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. त्यामुळे बसस्थानक सहजासहजी दिसून येत नव्हते. मात्र आता काही फळविक्रेत्यांनी थेट बसस्थानकासमोरच फळांची दुकाने लावली आहेत. त्यामुळे प्रवाशांनी थांबावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फळविक्रेते बसस्थानकाच्या सावलीचा आडोसा घेत आहेत. तर प्रवाशांना मात्र भर उन्हात रस्त्यावर उभे राहून बसची वाट बघावी लागत आहे.
एखाद्या शासकीय इमारतीमध्ये अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असली तरी हा नियम आलापल्ली येथे पायदळी तुडविला जात आहे. आज एकच दुकान समोर थाटण्यात आले असले तरी भविष्यात या दुकानदारावर नियंत्रण न ठेवल्यास बसस्थानकासमोरील संपूर्ण जागा हडप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)