आधीच तुटपुंजे अनुदान, त्यात अन्नधान्यही बंद; वसतिगृह चालकांवर उधारी, उसनवारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 02:05 PM2024-11-30T14:05:51+5:302024-11-30T14:07:31+5:30
दोन महिन्यांपासून पुरवठा ठप्प: अनुदानित संस्थांतील विद्यार्थ्यांची परवड, धान्य वितरण करण्याची मागणी; जिल्हा पुरवठा विभागाचा वरिष्ठांशी पत्रव्यवहार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून कल्याणकारी वसतिगृहांचा अन्नधान्य पुरवठा ठप्प आहे. परिणामी वसतिगृहचालकांवर उधारी, उसनवारी करून विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करावी लागत आहे. आधीच तुटपुंज्या अनुदानामुळे संस्थाचालक हैराण आहेत, त्यात अन्नधान्यासाठीही पदरमोड करावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या कल्याणकारी संस्थांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०२४ पर्यंत अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले होते त्याचे वाटपही तेव्हाच केले गेले. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरीही अद्याप ऑक्टोबरचे अन्नधान्य मिळाले नाही. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे नियतन विनाविलंब अदा करावे, अशी मागणी आता संस्थांचालकांकडून होत आहे.
६० अनुदानित वसतिगृहे जिल्ह्यात आहेत
शासनाकडे वसतिगृहचालकांच्या विविध मागण्या आधीच प्रलंबित आहेत. अतिशय तुटपुंज्या अनुदानात वसतिगृह चालविताना नित्याची कसरत होते. त्यातच शासनाकडून वेणारे धान्यही दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे वसतिगृहचालकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. वासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी.
- वर्षा शेडमाके, जिल्हा कार्याध्यक्ष वसतिगृह संघटना
"कल्याणकारी वसतिगृहांसाठी वाढीव नियतन मंजुरीकरीता पाठपुरावा केलेला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचे वितरण आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, आता परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वखार महामंडळाकडून धान्य उपलब्ध होईल. त्याचे विनाचिलब वितरण करू."
- प्रकाश आघाव, जिल्हा पुरवठा अधिकारी