गडचिरोलीच्या दारूबंदीचीही समीक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:37+5:302021-05-29T04:27:37+5:30
गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी ...
गडचिराेली : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यातही उमटले आहे. या जिल्ह्यात केलेली दारूबंदी कितपत यशस्वी झाली, त्याचे काय फायदे झाले, किती नुकसान झाले या सर्व अंगांनी दारूबंदीची समीक्षा करावी, असा सूर सामाजिक-राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमधून उमटत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीमुळे अवैध विक्रीला प्रचंड वेग आला हाेता. त्या ठिकाणी दारूबंदी पूर्णत: फसली. अशीच स्थिती थोड्याफार फरकाने गडचिराेली जिल्ह्यात आहे. विशेषत: आदिवासी समाजाला मोहफुलाची दारू स्वत:साठी गाळण्याची परवानगी असल्याने त्याच्या आड अनेक जण दारूचा व्यवसाय करतात. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यात तर प्रचंड प्रमाणात हातभट्टीची दारू गाळल्या जाते. याशिवाय काही प्रमाणात बनावट दारूही आयात केली जाते.
---
दारूबंदीमुळे काेणतीही व्यक्ती व्यसनमुक्त झाली नाही. उलट विषारी दारूमुळे जास्त प्रमाणात आरोग्य बिघडले. शाळकरी मुले, महिला पैशाच्या लोभापायी वाईट मार्गाला लागल्या. चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यांची सामाजिक, आर्थिक, भाैगाेलिक परिस्थिती सारखीच असल्यामुळे गडचिराेली जिल्ह्यातील दारूबंदीची समीक्षा व्हावी. दारूबंदीला मोजक्या लोकांच्या कमाईचे साधन करण्याऐवजी सामाजिक विचार करावा.
- डाॅ.प्रमाेद साळवे
सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेल
----
गेल्या ३० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी अवैध दारू सुरूच आहे. दारूमाफियांचे धंदे सुरूच आहे. त्यामुळे चंद्रपूरप्रमाणे दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती नेमावी. या जिल्ह्यात दारूबंदी करून येथील गरीब-आदिवासी लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटले. त्यांचे मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले. शासनाचाही महसूल बुडाला.
- माणिकराव तुरे
ज्येष्ठ आरपीआय नेता, चामोर्शी
----
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. गडचिरोली जिल्ह्यातही दारुबंदीचा कोणताही फायदा झाला नाही. उलट अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. जिल्ह्यात दारूविक्रीचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. अशी कागदावरील दारूबंदी काही उपयोगाची नाही. पर्यटन थांबले व उद्योगलाही त्याचा फटका बसला. या जिल्ह्याला दारूबंदीतून मुक्त करावे.
- रविकिरण समर्थ
माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडी