विहिरीसाठी आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2017 01:36 AM2017-06-01T01:36:48+5:302017-06-01T01:36:48+5:30
गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : गत ६०- ७० वर्षांपासून खुली असलेली विहीर लोकसहभागातून ग्रामपंचायतीने चांगली बांधली. त्यानंतर त्या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करीत होते. दरम्यान, काही जणांनी अतिक्रमण करून पाणी बंद केल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत संबंधितांना निवेदने देवूनसुध्दा दखल घेतली नसल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारोती तिवाडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मूल तालुक्यातील मौजा नवेगाव (भू) येथील वार्ड नं. १ मधील बेलाची विहीर गत ६० ते ७० वर्षांपासून खुली असून गावकरी पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहे. त्यामुळे लोकसहभागातून ग्रामपंचायतीने या विहिरींचे चांगले बांधकामसुध्दा केले. दरम्यान, विनायक बालाजी देशमुख यांनी अतिक्रमण करून विहिरीला काटेरी कुंपण लावून गावकऱ्यांचे पाणी बंद केलेले आहे.
सदर बाब तंटामुक्ती समितीसमोर आल्याने अतिक्रमण हटविण्यासाठी सर्वसंमतीने ठराव पारित केला. परंतु विनायक देशमुख यांनी विहिरीवर हक्क दाखविणे सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी संबंधिताकडे निवेदने देवून विहीर खुली करण्याची मागणी केली. परंतु याची संबंधितांकडून दखल घेण्यात आली नाही.
परिणामी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची अधिक गरज पडते. मात्र याचवेळी पाणी टंचाईदेखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तरीही या विहिरीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे २५ मेपासून तंमुस अध्यक्ष मारोती ऋषी तिवाडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तप्त उन्हात ते तीन दिवसांपासून उपोषण करीत असून त्यांची प्रकृती खालावत आहे. मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.