रूग्णवाहिका झाडाला धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:41 AM2019-03-10T00:41:09+5:302019-03-10T00:41:48+5:30
एका रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचवून पेरमिलीकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली- पेरमिली मार्गावर आरेंदा फाटयानजीक घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : एका रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचवून पेरमिलीकडे परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. यात चालक जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली- पेरमिली मार्गावर आरेंदा फाटयानजीक घडली. विनोद सांगरे असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे.
पेरमिली येथील रहीवासी विजय दुर्गे (५०) या रूग्णाला औषधोपचारासाठी सुरूवातीला पेरमिलीच्या आरोग्य केंद्रात भरती केले होते. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशान तुरकर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात रेफर करण्यास सांगितले. त्यानंतर या केंद्राच्या रूग्णवाहीकेने सदर रूग्णाला अहेरीच्या रूग्णालयात पोहचविले. येथून रुग्णवाहिका घेऊन चालक विनोद सांगरे पेरमिलीकडे एकटाच निघाला. दरम्यान आलापल्ली- पेरमिलीच्या मधात आरेंदा फाटयानजीक समोरून ट्रक आला.
या ट्रकचालकाकडून साइड मिळाली नाही. अशा स्थितीत आरोग्य विभागाचे एम. एच. ३३-जी ६६९ क्रमाकांचे हे वाहन रस्त्यालगतच्या झाडावर आदळले. यात वाहन चालक विनोद सांगरे जखमी झाला. सदर घटनेचा तपास पेरमिलीचे प्रभारी पोलीस अधिकारी महेश मतकर करित आहेत.
पल्स पोलिओ मोहिमेसाठी वाहन उपलब्ध करणार
अपघातामुळे पेरमिली केंद्राची रूग्णवाहीका पूर्णता क्षतीग्रस्त झाली. त्यामुळे आता पल्स पोलिओ मोहीमेसाठी वाहनाची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. ईशान तुरकर यांना विचारणा केली असता रविवारी होणाऱ्या पल्स पालिओ मोहीमेसाठी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले.