अमेरिकन मुलांच्या भेटवस्तू पोहोचल्या गडचिरोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:23 AM2018-10-26T00:23:28+5:302018-10-26T13:05:11+5:30
अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
ख्रिसमस सणानिमित्त भेटवस्तू देण्याची परंपरा अमेरिकेत आहे. अमेरिकेतील सॅमॅरिटन्स पर्स चर्चचे प्रमुख फ्रँकलीन ग्राहम हे अमेरिकन मुलांना त्यांच्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत करण्यासाठी प्रवृत्त करतात. बचत झालेले पैसे फॅकलिन ्नग्राहम यांच्याकडे जमा केले जातात. या पैशातून फ्रँकलीन स्वत: साहित्य खरेदी करून गरीब देशातील गरजू मुला, मुलींना वितरित करतात. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारती सेवक संगती या सेवाभावी संस्थेने भेटवस्तू गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हाव्या, यासाठी फ्रँकलीन ग्राहम यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार फ्रँकलीन यांनी भारतीय सेवक संगती संस्थेकडे साहित्य उपलब्ध करून दिले.
अमेरिका ते मुंबई पुढे देलनवाडी असा प्रवास करत या वस्तू देलनवाडी येथे पोहोचविण्यात आल्या. या कार्यासाठी भारतीय सेवक संगतीचे प्रमुख प्रफुल्ल गद्देलवार, रवींद्र खोब्रागडे, माया खोब्रागडे, सूरज खोब्रागडे, अमोल कावठवार यांनी पुढाकार घेतला. साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी अनिलकुमार ठवरे, अश्विनी ठवरे, जवंता ठवरे, कुमरी पलछीन ठवरे यांनी सुद्धा शिफारस केली होती.
देलनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून अमेरिका येथून प्राप्त झालेल्या वस्तू देलनवाडी येथील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. वस्तूंमध्ये शैक्षणिक साहित्य, आकर्षक खेळणी, टी-शर्ट, पॅन्ट, घरगुती वापराच्या वस्तू, टॉर्च, साबन, पुस्तके यांचा समावेश आहे. अत्यंत चांगल्या व आकर्षक वस्तू असल्याने देलनवाडी येथील विद्यार्थी भारावून गेले. सुंदर व उपयोगी वस्तू बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. विशेष म्हणजे दिवाळीच्या पूर्वीच वस्तू उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
वस्तू वितरण कार्यक्रमाला मुख्याध्यापक बन्सोड, अंजिरा मालई, राहुल बन्सोड, संतोष मने, विजय मडावी यांच्यासह पं.स.सदस्य किरण मस्के, तंमुस अध्यक्ष विनायक गरमळे, विजया नेवारे, कोमल धुर्वे, रमेश भैसारे, वाल्मिक नन्नावरे, वैशाली भैसारे, रेखा जांभुळे, रूपाली टेंभूर्णे, पल्लवी कुमरे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.