आमगाव-भिवापूर मार्गाची दुरूस्ती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:25 AM2018-03-28T01:25:45+5:302018-03-28T01:25:45+5:30
तालुक्यातील आमगाव-वालसरा-भिवापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी पाठपुरावा केला.
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : तालुक्यातील आमगाव-वालसरा-भिवापूर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामार्गाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी व डांबरीकरणासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे नुकतेच जि.प. अध्यक्षा भांडेकर यांनी भूमिपूजन केले.
कुरुड-आमगाव-विसापूर या जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्याची समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून पक्के रस्ते जोडण्यासाठी जि. प. अध्यक्ष भांडेकर यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. दरम्यान जि. प. च्या ३०/५४ व ५०/५४ निधी अंतर्गत आमगाव-वालसरा-भिवापूर या रस्त्याच्या कामासाठी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला पं. स. सदस्य उषा सातपुते, रेखा नरोटे, सरपंच भाविका देवतळे, मधुकर भांडेकर, वालसराच्या सरपंचा वनिता वासेकर, शालू सातपुते, सरपंच जयश्री दुधबळे, उपसरपंच उदयसिंग धिरबांशी, विजय सातपुते, रमेश नरोटे, भाऊराव देवतळे, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण जुआरे, उपसरपंच लालाजी भोयर, ग्रामसेविका माधुरी मेश्राम, पिपरे उपस्थित होते. सदर रस्त्याचे काम जि. प. बांधकाम विभागाच्या गडचिरोली उपविभाग चामोर्शी अंतर्गत होणार आहे. तीन गावांसाठी हा रस्ता सोयीचा होणार आहे.