आईस फॅक्टरीतून अमोनियाची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 10:58 PM2019-05-06T22:58:59+5:302019-05-06T22:59:16+5:30
येथील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या आईस फॅक्टरीतून सिलिंडरमधून अमोनिया वायूची सोमवारी गळती सुरू झाली. त्यामुळे कारखान्यासभोवतालच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागले. वेळीच अग्निशमन दलालाने पाण्याचा फवारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येथील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या आईस फॅक्टरीतून सिलिंडरमधून अमोनिया वायूची सोमवारी गळती सुरू झाली. त्यामुळे कारखान्यासभोवतालच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागले. वेळीच अग्निशमन दलालाने पाण्याचा फवारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.
पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस केदारवाड्यात बर्फ निर्मिती करणारी फॅक्टरी आहे. बर्फाची निर्मिती करण्यासाठी अमोनिया वायूचा वापर केला जातो. यासाठी फॅक्टरीमध्ये स्वतंत्र सिलिंडर आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सिलिंडरमधून अमोनिया वायूची गळती होण्यास सुरूवात झाली. आईस फॅक्टरीमधील एका मजुराला रुग्णालयात भरती करावे लागले. तर सभोवतालच्या दुकानदारांना जळजळ वाटण्यास सुरूवात झाली. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन, नगर परिषदेला याबाबतची माहिती दिली. नगर परिषदेने अग्निशमन बोलावून इमारतीवर पाण्याचा मारा केला. अमोनिया हा वायू पाण्यामध्ये विरघळते. त्यामुळे काही वेळात अमोनियाचा प्रभाव कमी झाला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी स्वत: उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परिस्थिती सध्या आटोक्यात आहे.
वस्तीतून आईस फॅक्टरी हटविण्याची मागणी
केदारवाडा हा अगदी गडचिरोली शहराच्या मध्यभागी आहे. याच ठिकाणी आईस फॅक्टरी आहे. या आईस फॅक्टरीच्या सभोवताल दुकाने व लोकवस्ती आहे. या ठिकाणी अमोनिया व फ्रेआॅन या वायूंचा वापर केला जातो. हे दोन्ही वायू आरोग्यास हानीकारक आहेत. अमोनिया व फ्रेआॅन वायु गळतीमुळे दिल्ली येथील आईस फॅक्टरीत जवळपास २०० व्यक्ती बाधित झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू सुद्धा झाला. अशी दुर्घटना गडचिरोलीतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर आईस फॅक्टरी शहरातून हटवावी, अशी मागणी अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांनी केली आहे.